पडलेला मोबाईल उचलण्यासाठी महिलेने मेट्रो ट्रॅकवर मारली उडी अन्…
कधी कधी अनेक प्रवासी जीव धोक्यात घालतात. पण यामुळे इतर प्रवाशांना देखील त्याचा त्रास होतो. अशीच एक घटना पुढे आली आहे. ज्यामध्ये महिलेने आपला मोबाईल पडला म्हणून मेट्रोच्या ट्रॅकवर उडी मारली. स्टेशनवर घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. प्रवाशी महिला तिचा फोन घेण्यासाठी रुळावरून खाली गेली होती.
बंगळुरु : एका महिलेने तिचा मोबाईल फोन खाली पडला म्हणून तो घेण्यासाठी 750 केव्ही वीज असलेल्या मेट्रो ट्रॅकवर उडी मारली. सोमवारी सायंकाळी ६.४५ वाजता इंदिरानगर मेट्रो स्टेशनवर ही घटना घडली. रुळावर असलेल्या महिलेला पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि वीज खंडित करण्यात आली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
15 मिनिटे मेट्रो सेवा विस्कळीत
या घटनेमुळे पर्पल लाईनवरील मेट्रो सेवा गर्दीच्या वेळी १५ मिनिटे विस्कळीत झाली होती. बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) ने मंगळवारी सांगितले की, इंदिरानगर मेट्रो स्टेशनवर घडलेल्या घटनेत महिलेचा मोबाईल फोन मेट्रो ट्रॅकवर पडला होता. महिला प्रवाशी तिचा फोन मिळवण्यासाठी ट्रॅकवर गेली आणि सुरक्षा कर्मचार्यांनी तिची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा उपकरणे सक्रिय केली.
फोन परत घेतल्यानंतर ती महिला सहप्रवाशाच्या मदतीने प्लॅटफॉर्मवर परतली. बीएमआरसीएल कर्मचाऱ्यांना सेवा पूर्ववत करण्यासाठी उपकरणे रीसेट करावी लागली.