काल हिरो, आज झिरो; गुजरात आणि हिमाचल प्रदेशात आपची कामगिरी काय?
हिमाचल प्रदेशात 68 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीचे कल हाती येत आहेत. त्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. काँग्रेस 33 जागा घेऊन आघाडीवर आहे.
अहमदाबाद: दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत काल दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज आम आदमी पार्टीच्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण काल भाजपकडून सत्ता खेचून घेत हिरो बनलेल्या आम आदमी पार्टीला अजून हिमाचल प्रदेशात खातंही खोलता आलेलं नाही. त्यामुळे कालचे हिरो, आज झिरो झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र, असं असलं तरी गुजरातमध्ये आम आदमी पार्टी वाढताना दिसत आहे. गुजरातमध्ये आप दोन अंकी आकडा गाठताना दिसत आहे. त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा असल्याचं बोललं जात आहे.
काल दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत आपने सर्वाधिक जागा मिळवत सत्ता काबीज केली आहे. आपने भाजपची गेल्या 15 वर्षाची सत्ता खेचून आणत नेत्रदिपक कामगिरी केली आहे. त्यामुळे देशातील वारं बदलत असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळेच आजच्या हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागंलं होतं. मात्र, या दोन्ही राज्यात आप मोठी कामगिरी करताना दिसत नाहीये.
हिमाचल प्रदेशात 68 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीचे कल हाती येत आहेत. त्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. काँग्रेस 33 जागा घेऊन आघाडीवर आहे. तर भाजप 32 जागांवर आघाडीवर आहे. तसेच इतरांना 3 जागा मिळताना दिसत आहेत. मात्र, आम आदमी पार्टीच्या हाती काहीच लागताना दिसत नाहीये. त्यामुळे आपला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
मात्र, या उलट आपसाठी गुजरातमधून दिलासादायक बातमी आहे. गुजरातच्या 182 गांपैकी 149 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस अवघ्या 19 जागांवर आघाडीवर आहे. गुजरातमध्ये काँग्रेस भूईसपाट झाल्याचं चित्रं दिसत आहे. दुसरीकडे आपला 10 जागा मिळताना दिसत आहे. आपने आतापर्यंत दहा जागांवर आघाडी घेतली आहे. ही संख्या मोठी नसली तरी भाजपसाठी येणाऱ्या काळात ही धोक्याची घंटा असू शकते, असं सांगितलं जात आहे.
दरम्यान, लिहून घ्या, गुजरातमध्ये आपचं सरकारच येईल असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला होता. मात्र, त्यांचा हा दावा सपशेल फोल ठरताना दिसत आहे. पंजाब प्रमाणेच गुजरातची जनता आपल्या हातात सत्ता देतील, असं केजरीवाल यांना वाटत होतं. मात्र, गुजराती मतदारांनी पुन्हा एका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास टाकल्याचं निवडणूक कलातून स्पष्ट होत आहे.