राम मंदिरातील मूर्तीचा फोटो आधीच लीक झाल्याने अधिकाऱ्यावर कारवाई होण्याची शक्यता
22 जानेवारीची प्रतिक्षा शिगेला पोहोचली आहे. देशभरात राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह दिसून येत आहे. अनेक वर्षानंतर राम मंदिराचं काम पूर्ण होत असल्याने आनंदाचे वातावरण आहे. आज रामलल्लाची मूर्ती सर्वांसमोर आली आहे. पण हा फोटो सोशल मीडियावर लीक झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Ram Mandir : 22 जानेवारीला होत असलेल्या राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी राम लल्लाचा फोटो लीक झाल्याने अयोध्येत तैनात असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. रामलल्लाचा फोटो लीक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर श्री राम मंदिर ट्रस्ट कारवाईत करण्याच्या तयारीत आहे. मंदिराच्या ट्रस्टला असा संशय आहे की, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल एल अँड टीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता रामललाचा फोटो व्हायरल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ट्रस्टकडून कारवाईची शक्यता आहे. अयोध्येत बांधल्या जात असलेल्या भव्य राम मंदिराचे काम लार्सन अँड टुब्रो (L&T) आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) च्या तांत्रिक सहाय्याने होत आहे. कंपनीतील काही कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने फोटो काढून व्हायरल केल्याची माहिती आहे. मात्र, हा फोटो कुठून व्हायरल झाला आहे, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.
18 जानेवारीला रामलला मंदिराच्या गर्भगृहात विराजमान
18 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती तयार केली आहे. या मूर्तीची उंची 51 इंच आहे. मूर्तीचे वजन दोन टन इतके आहे. ही मूर्ती मंदिरात आणली तेव्हा झाकून आणण्यात आली होती. मंदिरात त्याची स्थापना शुक्रवारी करण्यात आली. पण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधीच फोटो लीक झाल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
आज सोशल मीडियावर या मूर्तीचा फोटो व्हायरल झाला आहे. काळ्या दगडापासून ही मूर्ती बनवली गेली आहे. या मूर्तीच्या डोळ्यांवर आता पिवळे कापड बांधण्यात आले आहे. 22 जानेवारीला या मूर्तीवर अभिषेक होणार आहे.
22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. वैदिक विधी आणि पूजा करुन मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात आली आहे. आता २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी भारतातील अनेक दिग्गज लोकं उपस्थित राहणार आहेत. 23 जानेवारीपासून मंदिर लोकांसाठी खुले होण्याची अपेक्षा आहे.
अभिषेक सोहळ्यापूर्वी रामलल्लाचा आणखी एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये मूर्तीला संपूर्ण श्रृंगार घालण्यात आले आहे. फोटोत श्री रामाच्या चेहऱ्यावरचे गोड हास्य दिसत आहे. मूर्तीमध्ये रामाच्या हातात धनुष्य आणि बाणही दिसत आहेत.