राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यावर कारवाई होणार? भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
Assembly election 2023 : राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. आज राजस्थानमध्ये मतदान पार पडत असताना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी केलेल्या एका ट्विटमुळे भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
Rajasthan Election 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी केलेल्या ट्विटमुळे भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राजस्थानमध्ये मतदानादरम्यान राहुल आणि प्रियंका गांधी यांनी ट्विट केले होते. याबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि गुन्हा नोंदवावा, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
राजस्थानच्या मतदारांना मोफतचे आश्वासन देऊन प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे, जे लोकप्रतिनिधी कायद्याच्या विरोधात आहे. यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे.
राहुल आणि प्रियंका गांधी यांनी काय केले ट्विट?
ट्विटरवर ट्विट करताना राहुल गांधींनी लिहिले होते की, राजस्थान मोफत उपचार, स्वस्त गॅस सिलिंडर, बिनव्याजी कृषी कर्ज, इंग्रजीतून शिक्षण, OPS आणि जात जनगणना निवडेल. काँग्रेस नेत्याने मतदारांना मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर जनतेच्या हिताचे आणि हमीभाव असलेले काँग्रेसचे सरकार निवडून द्या, असेही ते म्हणाले.
मतदारांना आवाहन करताना प्रियंका गांधी यांनी ट्विट केले की, तुमचे प्रत्येक मत सुंदर भविष्य, हक्क आणि काँग्रेससाठी आहे. 50 लाखांपर्यंत मोफत उपचार, महिलांना वार्षिक 10 हजार रुपये, गॅस सिलिंडर 400 रुपयांना, जुन्या पेन्शनची कायदेशीर हमी, 10 लाख नवीन नोकऱ्या, घराचा हक्क, 2 रुपये किलोने शेणखत खरेदी, शेतकऱ्याला MSP , 2 लाखाचे विबनव्याजी कर्ज, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप , खाजगी शाळांमध्येही मोफत शिक्षण आणि जात जनगणना.
भाजप आणि काँग्रेसचे संबंधित दावे
राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे. गेल्या 25 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत सरकार बदलाचा येथे ट्रेंड आहे. ही प्रवृत्ती मोडीत काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर भाजपचे म्हणणे आहे की, यावेळी राज्यात आपले सरकार स्थापन होत आहे. दोन्ही पक्ष आपापले दावे करत आहेत. जोधपूरमध्ये मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, काँग्रेसविरोधात लाट नाही आणि पक्ष राज्यात पुन्हा सरकार स्थापन करेल.
सचिन पायलट यांनीही काँग्रेस सत्ता कायम ठेवेल, असा विश्वास व्यक्त केला. पायलट म्हणाले की, त्यांना विश्वास आहे की काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करेल. राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंग कुणार यांच्या निधनानंतर निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने १९९ जागांवर मतदान झाले.