प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 24 वर्षा पूर्वीच्या एका खटल्यात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे मेधा पाटकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, दिल्लीतील एका न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्याविरोधात जिल्हा न्यायालयात धाव घेणार असल्याचं मेधा पाटकर यांच्या सहकारी प्रतिभा शिंदे यांनी सांगितलं आहे.
दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दिल्लीच्या साकेत कोर्टाने मेधा पाटकर यांना शुक्रवारी दोषी ठरवले होते. त्यानंतर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट राघव शर्मा यांनी मेधा पाटकर यांना या प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या आम्ही स्वागत करतो, परंतु हा निर्णय दुर्दैवी आहे. हा निर्णय खालच्या कोर्टाने दिला असून आम्ही त्याविरोधात जिल्हा न्यायालय, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाऊ. आम्हाला वरच्या न्यायालयात न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
व्हि. के. सक्सेना हे नेहमी आंदोलन करणाऱ्या आणि आदिवासींच्या विरोधात राहिले आहेत. सक्सेना यांनी नेहमी नर्मदा बचाव आंदोलनाची बदनामी करून खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असा दावाही प्रतिभा शिंदे यांनी केला आहे.
मेधा पाटकर यांच्या विरोधात मानहानीचा फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता. 2000 पासून हा खटला सुरू आहे. सक्सेना यांनी मेधा पाटकर आणि नर्मदा बचाव आंदोलन करणाऱ्यांविरोधात जाहिराती प्रकाशित केल्या होत्या. त्यामुळे पाटकर यांनी हा खटला दाखल केला होता. हा खटला भरण्यात आला तेव्हा सक्सेना हे नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीजचे प्रमुख होते. ही एक स्वयंसेवी संस्था असून ती अहमदाबादमध्ये कार्यरत आहे. पाटकर यांनी खटला दाखल केल्यानंतर सक्सेना यांनीही त्यांच्याविरुद्ध अपमानास्पद विधान केल्याबद्दल पाटकर यांच्याविरोधात दोन खटले भरले होते. मेधा पाटकर यांनी 25 नोव्हेंबर 2000 मध्ये एक प्रेस नोट काढून सक्सेना यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
मेधा पाटकर यांनी प्रेसनोटमध्ये गंभीर आरोप केले होते. हवाला व्यवहारावरून सक्सेना दु:खी झाले आहेत. सक्सेना स्वत: मालेगावला आले होते. एनबीएची प्रशंसा केली आणि 40 हजार रुपयांचा चेक घेऊन गेले होते. त्यानंतर लोक समितीने लगेच रिसीप्ट आणि पत्र पाठवलं होतं. प्रामाणिकपणा आणि चांगल्या रेकॉर्डचं हे द्योतक आहे. पण चेक वटला नाही आणि तो बाऊन्स झाला. चौकशी केल्यावर असं काही खातच नसल्याचं बँकेने स्पष्ट केलं होतं, असं सांगतानाच सक्सेना देशभक्त नसून भित्रे असल्याचं मेधा पाटकर यांनी म्हटलं होतं. या प्रकरणी कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. मेधा पाकर यांनी जाणूनबुजून सक्सेना यांची प्रतिमा मलिन केली. त्यांच्या प्रतिष्ठेचा ठेच पोहोचवल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.