ISRO : चंद्रयान 3 मोहिमेनंतर इस्रो पुढच्या तयारीसाठी सज्ज, काय आहेत मिशन ते जाणून घ्या
ISRO : इस्रोची चंद्रयान 3 मोहीम आता यशाच्या उंबरठ्यावर आहे. काही तासातच ऐतिहासिक मोहिमेची नोंद होणार आहे. असं असताना इस्रो आता पुढच्या मोहिमेसाठी सज्ज असणार आहे.
मुंबई : चंद्रयान 3 चं चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग अवघ्या काही तासात होणार आहे. चंद्रयान 2 च्या अपयशानंतर ही मोहीम 100 टक्के यशस्वी होईल असा तमाम भारतीयांना विश्वास आहे. या मोहिमेत भारताला यश मिळालं तर चंद्रावर मोहीम राबवणारा चौथा देश ठरणार आहे. इतकंच काय तर दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा पहिला देश असेल. या मोहिमेकडे अमेरिका, रशिया, चीनसह संपूर्ण जगाचं लागून आहे. दुसरीकडे, चंद्रयान 3 मिशननंतर इस्रोची पुढची मोहीम काय? असा प्रश्नही पडला आहे. चंद्रयान 3 नंतर इस्रोच्या यादीत काही योजना आहेत. यात सूर्याचा अभ्यास करण्यासाठी एक मिशन, हवामान निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण, गगनयान मानवयुक्त अंतराळ उड्डाण कार्यक्रमांतर्गत प्रायोगिक यान परीक्षण, भारत आणि यूएस सिंथेटिक ऍपर्चर रडारचे प्रक्षेपण यांचा समावेश आहे.
इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, एक्सपोसॅटचं (एक्सरे पोलारीमीटर उपग्रह) प्रक्षेपण केलं जाणार आहे. प्रकाशमान खगोलीय क्ष-किरण स्त्रोतांच्या विविध गतिशीलतेचा अभ्यास करणारे हे देशातील पहिले समर्पित ध्रुवीय मिशन असणार आहे. दुसरीकडे, सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित भारतीय वेधशाळा आणि आदित्य-L1 प्रक्षेपणासाठी तयारी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून केली जाणार आहे.
भविष्यात सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या संख्येने उपग्रह तयार केले जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि इस्रो संयुक्तपणे एक निरीक्षण उपग्रह तयार करणार आहे. निसार हा निरीक्षण उपग्रह 12 दिवसांत संपूर्ण जगाचा आढावा घेईल आणि पर्यावरणातील बदल, बर्फाचे वस्तुमान, वनस्पती, समुद्र पातळी वाढ, भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यासह नैसर्गिक संकटांची माहिती समजून एक डेटा तयार करेल.
इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ एस यांनी 15 ऑगस्ट रोजी इस्रोच्या मुख्यालयात स्वातंत्र्यदिनी संबोधित करताना सांगितले की, ‘आम्हाला भारत-अमेरिकेने बनवलेले सिंथेटिक अपर्चर रडार ‘NISAR’ लाँच करायचे आहे. त्यामुळे आमची लाँच लिस्ट मोठी आहे. देशातील पहिली मानवी अंतराळ उड्डाण मोहीम गगनयानसाठी क्रू एस्केप सिस्टमसाठी यानाची लवकरच चाचणी अपेक्षित आहे. इन्सॅट-३डीएस हा हवामान निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आहे. ‘