Chandrayaan-3 Update | गुजरातमधून इस्रोच्या तोतया शास्त्रज्ञाला अटक
Chandrayaan-3 Update | चांद्रयान-3 मधील इस्रोच्या यशाच हा तोतया क्रेडिट घेत होता. त्याने काही मीडिया समूहांना मुलाखती सुद्धा दिल्या होत्या. वास्तवात हा तोतया पेशान काय करतो? त्याने हे सर्व का केलं? जाणून घ्या.
नवी दिल्ली : चांद्रयान-3 च्या यशामुळे सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. सर्वांनाच इस्रोच्या वैज्ञानिकांना अभिमान वाटतोय. इस्रोच्या वैज्ञानिकांमुळे भारताला आज हे यश मिळालय. सर्वत्र इस्रोच्या वैज्ञानिकाच कौतुक सुरु असताना एका व्यक्तीने दिशाभूल केली. आपण इस्रोचा वैज्ञानिक असल्याच सांगून त्याने फसवणूक केली. विक्रम लँडरच आपण डिझाईन केलं, असा तोतया शास्त्रज्ञाने दावा केला होता. सूरत पोलिसांनी मंगळवारी हा दावा करणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीला अटक केली. आपण इस्रोशी जोडलेलो आहोत, हा दावा करणाऱ्या मेहुल त्रिवेदी विरोधात स्थानिक पोलिसांनी FIR नोंदवला आहे.
त्याने इस्रोच बनावट नियुक्तीपत्र बनवून घेतलं होतं. इस्रोच्या एका विभागात सहाय्यक चेअरमन म्हणून काम करत असल्याचा त्याने दावा केला होता. खरंतर मेहुल त्रिवेदी उपजिवीकेसाठी ट्युशन घेतो. त्याच्याकडे कॉमर्स शाखेतील पदवी आहे. आपणच लँडर मॉड्युल बनवल्याचा दावा करुन त्याने अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या होत्या. मेहुल त्रिवेदीला मिळणारी प्रसिद्धी पाहून भारतीय गोरक्षक मंचचे धर्मेंद्र गामी यांना संशय आला. त्यांनी शहराचे पोलीस आयुक्त अजय तोमर यांना अर्ज दिला. मेहुल त्रिवेदीच्या दाव्यावर संशय व्यक्त केला. त्रिवेदीचे दावे तपासण्यासाठी पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले.
त्याने हे सर्व का केलं?
“आम्ही इस्रोकडून मेहुल त्रिवेदीबद्दल माहिती मागवली. त्यांच्याकडून नकारात्मक प्रतिसाद आला. त्यानंतर आम्ही FIR नोंदवून मंगळवारी त्याला अटक केली” असं पोलीस निरीक्षक आरएस पटेल यांनी सांगितलं. आपल्या ट्युशन क्लासला लोकप्रिय करण्यासाठी म्हणून त्याने हे सर्व केलं, असं पटेल यांनी सांगितलं. आयपीसीच्या कलम 417, 464, 468 आणि 471 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कसं सुरु आहे मिशन?
भारताच्या महत्त्वकांक्षी चांद्रयान-3 मिशनची 14 जुलैला सुरुवात झाली होती. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 ने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. सध्या लँडर मॉड्युलमधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरकडून चंद्रावर जोरात संशोधन कार्य सुरु आहे. लँडर आणि रोव्हरने चंद्रावर अनेक गोष्टी शोधून काढल्या आहेत.