काहीही होऊ शकतं… वडिलांची अंतिम इच्छा म्हणून मृतदेहाला गंगाजलऐवजी दारु पाजली; कुठे घडला हा प्रकार?
माझ्या वडिलांना दारू पिण्याची सवय होती. अंत्यसंस्कारा पूर्वी आपल्याला दारू पाजल्या जावी अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यांच्या या इच्छेचंच आम्ही पालन केलं.
संभळ : मी मेल्यावर गंध गुलाल लावुनी तिरडी माझी सजवा, मात्र त्यावर टाकावयाची फुले दारुत आधी भिजवा. माझ्या अंत यात्रेला सर्वजण शुद्धीत असावेत. मात्र चार खांदेकरी थोडेसे प्यायलेले असावेत, अशी एक कविता मध्यंतरी चांगलीच व्हायरल झाली होती. कवी आपल्या कल्पनाविलासातून कविता लिहितो. पण हा कल्पनाविलास सत्यात उतरलेच याची काही शाश्वती नसते. पण वरील कवितेच्या ओळी तंतोतंत पटाव्यात अशी घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. वडिलांनी मृत्यूपूर्वी सांगितलं, मी मेल्यावर गंगाजल ऐवजी मला दारू पाजा. पोरंच ती… त्यांनीही चक्क वडिलांना दारू पाजून अखेरचा निरोप दिला. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. पण या घटनेची आता अख्ख्या उत्तर प्रदेशात जोरदार चर्चा होत आहे.
उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातील हल्लू सराय येथे ही घटना घडली. 65 वर्षीय गुलाब सिंह यांना दारू पिण्याची सवय होती. त्यांची सकाळच दारूचा घोट घेऊन सुरू व्हायची. दुपारीही दारू घ्यायचे. एवढेच कशाला रात्री झोपतानाही ते दारू पिऊनच झोपायचे. गुलाब सिंह यांची दारू सुटावी म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. अनेक डॉक्टरांना दाखवलं. एवढेच नव्हे तर जाणकारांनाही दाखवलं. दारू सुटण्यासाठीचा ज्या ठिकाणचा ठेपा मिळाला तिथे जाऊन त्यांनी गुलाब सिंह यांच्यासाठी औषधे आणली. औषधे संपली पण गुलाब सिंह यांची दारू काही सुटली नाही. शेवटी गुलाब सिंह यांचे कुटुंबीय थकले आणि त्यांनी प्रयत्न सोडून दिले.
दारूच्या अतिसेवनामुळे मृत्यू
8 मार्च रोजी होळीच्या दिवशी गुलाब सिंह यांनी प्रचंड दारू घेतली. दारू इतकी झाली की त्यांना तात्काळ डॉक्टरकडे न्यावं लागलं. मात्र, उपचार सुरू असतानाच अति दारूच्या सेवनामुळे गुलाब सिंह यांचं निधन झालं. त्यानंतर गुलाब सिंह यांचं पार्थिव घरी आणण्यात आलं. त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. त्यांचं पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आलं. त्यांच्या चितेला आग लावण्यापूर्वी गुलाब सिंह यांच्या मुलांनी त्यांच्या तोंडात गंगाजल ऐवजी दारूचे थेंब टाकले. अंत्यविधीसाठी आलेल्या काही लोकांनीही मृतक गुलाब सिंह यांना दारू पाजून शेवटचा निरोप दिला.
वडिलांचीच इच्छा होती
माझ्या वडिलांना दारू पिण्याची सवय होती. अंत्यसंस्कारा पूर्वी आपल्याला दारू पाजल्या जावी अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यांच्या या इच्छेचंच आम्ही पालन केलं. अंतिम संस्कार आणि शेवटच्या काळात जर व्यक्तीची शेवटची इच्छा पूर्ण केली तर त्या व्यक्तिला स्वर्ग मिळतो, असं प्राचीन काळापासून सांगितलं जातंय. आम्हीही तेच केलंय, असं गुलाब सिंह यांचा मुलगा बंटी सिंह यांनी सांगितलं.