Ajit Pawar | आधी शरद पवारांबरोबर भेट नंतर ‘दादा’ थेट दिल्लीत, अमित शाहं बरोबर काय चर्चा झाली? Video
Ajit Pawar | महाराष्ट्रात काल एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. अजित पवार आणि त्यांचे काका शरद पवार यांची पुण्यात भेट झाली. त्यानंतर अजित पवार थेट दिल्लीला निघून गेले. त्यामुळे विविध तर्क-वर्तक लढवले जातायत.
नवी दिल्ली : दिवाळी सणाला सुरुवात झालेली असताना महाराष्ट्रात काल एक मोठी राजकीय घडामोड घडली. पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. बाणेर रोडवर प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. ही भेट राजकीय नसून कौटुंबिक असल्याच सांगण्यात आलं. पण या दोन नेत्यांच्या भेटीनंतर विविध राजकीय तर्क-वितर्कांना ऊत आलाय. राजकीय विश्लेषक या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढतायत. कारण शरद पवार यांना भेटल्यानंतर अजित पवार थेट दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे चर्चांचा बाजार गरम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महिन्यांपूर्वी फूट पडली. सध्या राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट आहेत. अजित पवार गट सत्तेत तर शरद पवार गट विरोधी पक्षात आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दोन्ही गटांनी आपपाला दावा सांगितला आहे.
सध्या निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबद्दल सुनावणी सुरु आहे. दरम्यान अजित पवार काल दिल्लीला गेल्याने विविध चर्चा सुरु आहेत. अजित पवार सरकारमध्ये नाराज असल्याची देखील चर्चा होती. पण काल अमित शाह यांच्याबरोबर भेटीचे जे फोटो समोर आलेत, त्यावरुन तरी असं वाटत नाही. अमित शाह यांच्या बरोबरच्या भेटीत मराठा आरक्षण आणि राजकीय विषयांवर चर्चा झाली. जवळपास 45 मिनिट दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल उपस्थित होते.
प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय चर्चा?
अमित शाह यांच्यासोबतची बैठक संपल्यानंतर प्रफुल पटेल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली. निवडणूक आयोगातील सुनावणीवर या बैठकीत चर्चा झाली तसेच काही वकिलही या बैठकीला उपस्थित होते. शरद पवार यांना भेटून अजित पवार दिल्लीला रवाना झाल्याने चर्चांचा बाजार गरम झालेला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार गटाने घवघवीत यश संपादन केलय. शरद पवार गटापेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला आहे.