दहशतवाद्यांची राख करण्यासाठी भारतीय सेना सज्ज, आता फक्त ‘फायनल कॉल’ची प्रतीक्षा!
भारताचे तिन्ही सैन्यदल हायअलर्टवर आहे. अचानकपणे काही घडलंच तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचे वायूदल, भूदल, नौदल सज्ज झाले आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या हल्ल्याचा यापेक्षा मोठा बदला घेतला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे बोलून दाखवले आहे. असे असतानाच आता भारताचे तिन्ही सैन्यदल हायअलर्टवर आहे. अचानकपणे काही घडलंच तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचे वायूदल, भूदल, नौदल सज्ज झाले आहे.
भूदलाची काय तयारी?
भारतीय सेनेकडून युद्धासाठीची रणनीती आणि शस्त्राभ्यास याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. पाकिस्ताजवळील एलओसीवर सर्वात पुढे भारतीय भूदलाचे सैनिक असतात. पहलगाम घटनेनंतर भूलद अलर्ट मोडवर गेले आहे. भूदलाने राजस्थानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी युद्धाभ्यास केला आहे. भारतीय सेनेने याला नियमित युद्धाभ्यास असल्याचे सांगितले आहे. मात्र सैन्य सध्या चांगलेच अलर्ट झाले आहे.
कोणकोणती शस्त्र सज्ज?
भारतीय भूदलातर्फे व्हिक्टर फोर्स, राष्ट्रीय रायफल्स, पॅरा स्पेशल पोर्स यूनिट्सला दक्षीण काश्मीर आणि एलओसीच्या आसपास तैनात करण्यात आलंय. तसेच मोस्ट फॉरवर्ड पोस्टवर टी-90 भीष्म टँक, स्पाईक यासारख्या अॅटी टँक गायडेड मिसईल सिस्टिम्स, पिनाका मिसाईल सिस्टिम्स तैनात करण्यात आल्या आहेत. हेरोन तसेच स्वदेशी ड्रोनच्या माध्यमातून एलओसीच्या पलीकडे नेमकं काय चाललंय यावर चोवीस तास लक्ष ठेवण्यात येत आहे.
वायूसेनाही अलर्ट मोडवर
भारताची वायुसेनादेखील चांगलीच दक्ष झाली आहे. भारताचे Su-30MKI, Mirage-2000, आणि Rafale विमान पंजाब, जम्मू आणि श्रीनगर एअरबेसवर तयार आहेत.
भारतीय नौसेनेची काय तयारी?
पहलगाममध्ये झालेला हल्ल्याच्या ठिकाणी नौसेनेची तशी भूमिका नाही. मात्र काही अनूचित प्रकार घडलाच तर त्याला तोंड देण्यासाठी भारतीय वायूसेनादेखील अलर्ट आहे. नौसेनेने पश्चिमी समुद्रावर आपली गस्त वाढवली आहे. नौसेनेने पाकिस्तानी नौसेनेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी P-8I Poseidon विमानाला तैनात केलं आहे. अरबी समुद्रात मिसाईल विध्वसंक, फ्रिगेट्स यासारखी प्रमुख जहाजं गस्तीवर आहेत. आयएनएस विक्रांतला कारवार बेसवर तैनात करण्यात आलं आहे. नौदालकडे असणारे हेलिकॉप्टर्स, एअरक्राफ्ट्सही तयार ठेवण्यात आले आहेत. यामध्ये Mig-29, MH-60R यासारख्या विमानांचाही समावेश आहे.
दरम्यान, आगामी काळात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला तोंड देण्यास भारतीय सेना पूर्ण ताकदीनिशी तयार आहे. त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतरचे आगामी काही दिवस फार महत्त्वाचे असणार आहेत.