चीनहून परतले, मालदीवच्या अध्यक्षांनी भारतावर डोळे वटारले, म्हणाले ‘आम्हाला धमकावण्याचा परवाना…’
परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील मालदीवच्या दुतावासांना बोलावून या प्रकरणावर तीव्र आक्षेप व्यक्त केला. दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणाव कायम असतानाच चीन समर्थक मानले जाणारे अध्यक्ष मुइज्जू यांनी पाच दिवसांचा चीन दौरा केला.
मालदीव | 13 जानेवारी 2024 : चीन समर्थक मानल्या जाणाऱ्या मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी पाच दिवसांचा चीन दौरा केला. यावेळी दौऱ्यात त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्याबद्दल मालदीव सरकारने तीन मंत्र्यांना निलंबित केले होते. तर, भारतातही त्या मंत्र्याच्या विधांनाचे गंभीर पडसाद उमटले होते. भारत आणि मालदीव देशांमध्ये असे वादाचे वातावरण निर्माण झाले असतानाच अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी चीनचा दौरा केला. या दौऱ्यावरून परत येताच अध्यक्ष मुइज्जू यांनी डोळे वटारले आहेत. तसेच त्यांनी सूचक इशाराही दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल मालदीव सरकारमधील तीन मंत्र्यांना निलंबित करण्यात आले होते. तर, परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील मालदीवच्या दुतावासांना बोलावून या प्रकरणावर तीव्र आक्षेप व्यक्त केला. दोन्ही देशांमध्ये राजनैतिक तणाव कायम असतानाच चीन समर्थक मानले जाणारे अध्यक्ष मुइज्जू यांनी पाच दिवसांचा चीन दौरा केला. यावेळी त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली.
मुइज्जूची यांची पहिलीच चीन भेट ठरली वादग्रस्त
अध्यक्ष मुइज्जू यांचा हा पहिलाच चीन दौरा होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर दोन्ही देशामधील वातावरण गढूळ झाले. असे असताना मुइज्जू यांनी चीनला भेट दिल्यामुळे ही भेट वादग्रस्त ठरली. मुइज्जू यांनी या भेटीदरम्यान त्यांनी चीनला मालदीवमध्ये अधिकाधिक चिनी पर्यटक पाठवण्याचे आवाहन केले. मालदीव बिझनेस फोरमला संबोधित करताना ते म्हणाले होते की, ‘कोविडपूर्वी आपल्या देशात येणारे बहुतेक पर्यटक हे चीनचे होते. त्यामुळे चीनने पुन्हा पर्यटक यावेत यासाठी प्रयत्न तीव्र करावे.
मुइज्जू यांचा ‘इंडिया आउट’चा नारा
मालदीवचे नवे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये सुमारे 75 भारतीय सैनिकांची छोटी तुकडी काढून टाकण्याचे वचन दिले होते. भारतीय सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी भारत आणि मालदीव यांनी एक कोअर ग्रुप ही तयार केला आहे. मुइज्जू यांचा निवडणुकीमध्ये ‘इंडिया आउट’ असा नारा दिला होता. तसेच, मालदीवच्या ‘इंडिया फर्स्ट पॉलिसी’मध्ये बदल करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आक्षेपार्ह विधानानंतर भारतात baycot मालदीव अशी मोहीम सुरु झाली होती. त्यामुळे मोहम्मद मुइज्जू यांनी थोडी नरमाईची भूमिका घेतली होती. मात्र, चीनचा दौरा पूर्ण करून मायदेशी आल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला अप्रत्यक्षपणे मोठा इशारा दिलाय.
मालदीवमध्ये परत येताच अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी आपण एक छोटासा देश असू शकतो. पण, त्यामुळे आपल्याला धमकावण्याचा परवाना कोणालाही मिळत नाही अशा शब्दात अप्रत्यक्षपणे भारताला इशारा दिलाय.
काय वाद आहे?
पंतप्रधान मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांनी पीएम मोदींच्या दौऱ्यातील काही छायाचित्रांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तेव्हापासून दोन्ही देशांमधील राजनैतिक वाद अधिक वाढला आहे.