नवी दिल्ली- न्यायमूर्ती उदय उमेश ललित (Justice U U Lalit)यांनी सुप्रीम कोर्टाचे 49 वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आज शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (President Draupadi Murmu)यांनी त्यांना या पदाची शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती यांनी राष्ट्रपती आणि तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना हात जोडून अभिवादन केले. रजिस्टरवर सही केली, त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपतींना हात जोडून अभिवादन केले. त्यानंतर न्यायमूर्ती ललित व्यासपीठावरुन खाली उतरले आणि पहिल्या रांगेत एका कोपऱ्यात बसलेल्या आपल्या वडिलांच्या समोर जाऊन उभे राहिले. वरिष्ठ वकील असलेले यू आर ललित यांच्या पायाला हात लावून (touch his father feet)त्यांनी वडिलांचे आशीर्वाद घेतले. हे दृश्य पाहून राष्ट्रपती भवनात असलेल्या सगळ्यांनाच सर्वोच्च न्यायमूर्तींबाबतचा आदर वाढला. त्यावेळी एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर ललित यांनी परिवारातील इतर सदस्यांनाही वाकून नमस्कार केला.
LIVE: Swearing-in-Ceremony of the Chief Justice of India Justice Uday Umesh Lalit https://t.co/iR0G7nmRKF
हे सुद्धा वाचा— President of India (@rashtrapatibhvn) August 27, 2022
जस्टिस ललित यांचा कार्यकाळ 74 दिवसांचा असणार आहे. ते आठ नोव्हेंबरला रिटायर होणार आहेत. त्यांच्यानंतर सर्वात अनुभवी न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे मुख्य न्यायमूर्ती होतील. न्यायमूर्ती ललित यांना वकिलांच्या बार संघटनेतून 2014 साली थेट सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती केले होते. त्यांच्यापूर्वी हा मान न्यायमूर्ती एस एम सिकरी यांना 1971 साली मिळाला होता. शनिवारी आयोजित या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, कायदेमंत्री किरण रिजिजू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
न्यायमूर्ती ललित यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1957 साली झाला होता. ते महाराष्ट्रातील आहेत. 1983 साली त्यांनी वकिलीची सुरुवात मुंबई हायकोर्टातून केली होती. त्यानंतर 1986 साली ते दिल्लीला शिफ्ट झाले. तिथे गुन्हेगारीच्या प्रकरणात चांगले वकील असा नावलौकिक त्यांनी मिळवला. 2 जी केसमध्ये त्यांना 2011 साली सुप्रीम कोर्टात विशेष सरकारी वकील नेमण्यात आले. 13 ऑगस्ट 2014 रोजी त्यांना थेट सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आले.