पराभवानंतर ही मिळाले मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान, हे दिग्गज मात्र बाहेर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी तिसऱ्यांदा आपले सरकार स्थापन केले आहे. रविवारी त्यांच्यासोबत एकूण ७२ मंत्र्यांनी शपथ घेतलीये. पण मंत्रिमंडळाबाबत मोदी सरकारने पुन्हा एकदा आर्श्चयाचा धक्का दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींसोबत 30 कॅबिनेट मंत्र्यांनीही शपथ घेतली. तर 36 राज्यमंत्री आणि पाच मंत्री (स्वतंत्र प्रभार) यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदींनी यंदाही आश्चर्याचा धक्का दिला. कारण पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात पराभूत झालेल्या उमेदवाराला ही स्थान दिले आहे. हमीरपूरमधून मोठा विजय मिळवणारे अनुराग ठाकूर यांना मात्र मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.
अनुराग ठाकूर हे मोदी सरकार 2.0 मध्ये मंत्री होते. त्यांच्याकडे क्रीडा मंत्रालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी होती. 2019 मध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2021 मध्ये त्यांना बढती मिळाली आणि ते कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्याकडे माहिती प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. आता जेपी नड्डा यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने त्यांना बाहेर राहावे लागले आहे. जेपी नड्डा आणि अनुराग ठाकून दोघे ही हिमाचल प्रदेशमधून येतात. त्यामुळे दोघांपैकी एकालाच संधी देण्यात आली.
पराभवानंतर ही मंत्रीपद
पंजाबच्या लुधियाना मतदारसंघातून दोन वेळा खासदार राहिलेले रवनीत बिट्टू यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. लुधियानाच्या जागेवर अमरिंदर राजा वाडिंग यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण तरी देखील त्यांना मंत्री केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता सहा महिन्यांत त्यांना राज्यसभा किंवा लोकसभेत निवडून जावे लागणार आहे. रवनीत बिट्टू हा पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू आहेत. 1999 मध्ये खलिस्तानी हल्ल्यात बेअंत सिंग यांची हत्या झाली होती.
जॉर्ज कुरियन हे देखील मंत्री झाले आहे. केरळमध्ये ते भाजपचे सरचिटणीस आहेत. पेशाने वकील असलेले कुरियन हे जवळपास ३० वर्षांपासून भाजपसाठी काम करत आहेत. पक्षाच्या अल्पसंख्याक सेलमध्ये त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. भाजपला आता दक्षिणेत आपले जनमत वाढवायचे आहे आणि ख्रिश्चनांमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी कुरियन यांना मंत्री केल्याचे बोलले जात आहे.
रविशंकर प्रसाद यांना मंत्रिमंडळात स्थान नाही
सुमारे दोन दशके खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांना यंदा मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. त्यांनी बिहारच्या पटना साहिबमधून विजय मिळवलाय. याशिवाय पाच वेळा खासदार असलेले राजीव प्रताप रुडी यांनाही मंत्रीपद मिळालेले नाही. सारणमधून ते तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात बिहारमधील आठ मंत्री आहेत.
एल मुरुगन यांनी मोदी सरकार 2.0 मध्ये मंत्रीपद मिळाले होते. पण निवडणुकीत पराभव होऊनही मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. तर स्मृती इराणी आणि राजीव चंद्रशेखर यांना मात्र पराभवानंतर ही स्थान मिळालेले नाही. तामिळनाडूच्या माजी भाजप प्रमुख अन्नामलाई निवडणुकीत पराभूत होऊनही केंद्र सरकारमध्ये आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम रुपाला हे नरेंद्र मोदींच्या दोन्ही कार्यकाळात मंत्री होते, मात्र यावेळी त्यांना स्थान देण्यात आले नाही. गुजरातच्या राजकोटमधूनही त्यांनी मोठा विजय नोंदवला आहे.
मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नारायण राणे यांनी ही निवडणूक जिंकली आहे. पण त्यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. नारायण राणे यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोदी सरकार 2.0 मध्ये ते मंत्री होते. यावेळी नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विजय मिळवला आहे.