Narayana Murthy: नारायण मूर्ती यांनी त्या सल्लानंतर सांगितले ते किती तास काम करत होते…
Infosys Narayana Murthy: 70 तास काम करण्याचा सल्ला इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांना दिला होता. त्या सल्ल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते. अनेकांनी टीका केली होती. आता नारायण मूर्ती स्वत: किती तास काम करत होते, ही सांगितले आहे.
नवी दिल्ली | 10 डिसेंबर 2023 : प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांची तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे. त्यांची भाषणे, त्यांची वक्तव्य युवकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या अनेक गोष्टींचे अनुकरण युवक करत असतात. काही दिवसांपूर्वी नारायण मूर्ती यांनी तरुणांना 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या त्या वक्तव्याचा मात्र काही जणांनी सोशल मीडियावरुन समाचार घेतला. सोशल मीडियात मीम्सचा पाऊस पडला होता. त्यानंतरही नारायण मूर्ती आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले आहेत. त्यांनी पुन्हा यासंदर्भात वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी आपण स्वत: किती तास काम करत होतो, हे सांगितले आहे. नारायण मूर्ती स्वत: 85-90 तास काम करत होते.
सकाळी 6:20 वाजता सुरु होत होते काम
नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी एका मुलाखतीत म्हटले की, आपण सकाळी 6:20 वाजता कार्यालयात पोहचत होतो. रात्री 8:30 वाजता ऑफिस सोडत होतो. आठवड्यातील सहा दिवस काम करत होतो. इन्फोसिसच्या सुरुवातीच्या दिवसांपासून 1994 पर्यंत आपण 85 ते 90 तास काम केले. त्यानंतर कुठे यश मिळाले. त्याचा परिणाम आज इन्फोसिस आहे.
गरिबीपासून दूर राहण्याचे आई-बाबांनी सांगितले….
मेहनत आणि कठोर मेहतन हे मला माझ्या आई-बाबांनी शिकवले. गरिबीपासून वाचण्यासाठी तो एकमात्र उपाय असल्याचे त्यांनी म्हटले होते. कामाच्या प्रत्येक तासातून नवीन उर्जा मिळते. यामुळे आठवड्यातील सहा दिवस सतत काम केले पाहिजे. आठवड्याचे कामाचे तास 70 तरी झाले पाहिजे. चीन आणि जपान या देशांचा विकास वेगाने झाला. कारण त्या देशांनी उत्पादकता वाढवली. भारताचा विकास वेगाने होण्यासाठी युवकांनी देशासाठी या पद्धतीने परिश्रम केले पाहिजेत.
नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यावर देशात दोन गट पडले होते. 70 तास काम करण्याची कार्यसंस्कृती अनेकांनी रुचली नव्हती. 70 तास काम केल्यानंतर भारताचा विकास वेगाने होईल का’ असा प्रश्न सोशल मीडियावर काही जणांनी विचारला होता. परंतु अनेक जणांनी नारायण मूर्ती यांच्या वक्तव्याचे समर्थन केले होते.