लोकसभा निवडणुकीआधी भाजपचा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसला मोठा झटका
लोकसभा निवडणुकीआधी अनेक जण पक्ष बदलत आहे. यामध्ये सर्वाधिक फटका काँग्रेसला बसत आहे. अनेक मोठे नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये जात आहेत. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांना देखील मोठा झटका लागला आहे. कारण पक्षाच्या जुन्या नेत्याने आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे.
Loksabha election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीआधी पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. कारण आज टीएमसीचे ज्येष्ठ नेते आणि बारानगर मतदारसंघाचे आमदार तापस रॉय यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. सभापती बिमन बॅनर्जी यांच्याकडे त्यांना राजीनामा सुपूर्द केलाय. तापस रॉय हे नाराज असल्याची चर्चा होती.
विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर त्यांनी मीडियाला संबोधित करताना म्हटले की, ईडीच्या छाप्यानंतर पक्षाच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत शेख शाहजहानबाबत उल्लेख केला पण त्यांचे नावही घेतले नाही.
ममता बॅनर्जी यांना धक्का
तापस रॉय हे तृणमूल काँग्रेसचे जुने नेते आहेत. ते आधी काँग्रेसमध्ये होते. अनेकवेळा आमदारही राहिले आहेत. अलीकडे तापस रॉय आणि टीएमसीमध्ये काही मुद्द्यांवरून मतभेद सुरू झाले आणि अंतर वाढत गेले. त्यानंतर हे प्रकरण राजीनाम्यापर्यंत पोहोचले. तापस रॉय यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे काँग्रेसला देखील सातत्याने फटका बसत आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये राजीनाम्यांच्या रूपाने अनेक धक्के सहन करणाऱ्या काँग्रेसला आता गुजरातमधूनही मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील पक्षाचे दिग्गज नेते आणि कार्याध्यक्ष अंबरिश डेर यांनी पक्ष सोडल्याची घोषणा केली. आमदार आणि गुजरात युनिटचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोधवाडिया यांनी राजीनामा दिल्यानंतर ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
काँग्रेसला झटका
अंबरिश डेर यांच्यानंतर काँग्रेसचे आमदार अर्जुन मोधवाडिया यांनीही सोमवारी गुजरात विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. अर्जुन मोधवाडिया उद्या मंगळवारी अंबरिश डेर यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसह होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत अर्जुन मोढवाडिया भाजपचे उमेदवार म्हणून लढणार आहेत.
अर्जुन मोधवाडिया म्हणाले, “मी विद्यार्थीदशेपासूनच काँग्रेसशी जोडला गेलो होतो. सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मी पक्षासोबत काम करत होतो. पण काँग्रेस पक्ष जनतेच्या आपुलकीपासून दूर गेला आहे. राम मंदिराचे निमंत्रण मिळाले होते त्यावेळी त्यांनी हे उघडपणे सांगितले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंदिर बांधले जावे, अशी आमचीही इच्छा होती. मी नेहमीच माझी मते मांडण्याचा प्रयत्न केला. पण मी यशस्वी होऊ शकलो नाही.