अहमदाबादमध्ये हॉटेलच्या रुमचं एका रात्रीचं भाडं 50 हजार रुपये; असं काय घडलं?
नेटकऱ्यांनी या वाढीव किमतींबद्दल संताप व्यक्त केला आहे. वडोदरासारख्या शहरात राहून अहमदाबादला जाण्याचा पर्याय पर्यटकांना शोधाव्या लागत आहे.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये हॉटेलच्या रुमच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत. अचानक ही वाढ झाल्याने पर्यटकांना मोठा फटका बसला आहे. अहमदाबादमध्ये ब्रिटिश बँड कोल्डप्लेचे कॉन्सर्ट होणार आहे. त्यापूर्वीच शहरातील हॉटेलच्या रुमच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे नेटकरीही चांगलेच भडकले आहेत. या नेटकऱ्यांनी हॉटेलचे अनेक स्क्रिनशॉट आणि भाड्याचेही स्क्रिनशॉट शेअर करून संताप व्यक्त केला आहे. तर अनेक पर्यटकांना स्वस्तात हॉटेल बूक करता येत नसल्याने अहमदाबादला जाण्याचा प्लान रद्द करावा लागत आहे.
अहमदाबादमधील एक रुम रात्रभरासाठी बुक करण्यासाठी कमीत कमी 50 हजार रुपये मोजावे लागत आहेत. कोल्डप्ले कॉन्सर्ट पुढच्या वर्षी 25 जानेवारी रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आहे. यापूर्वी मुंबईत या बँडचे तीन शो झाले आहेत. पण अहमदाबादमध्ये कॉन्सर्टची तारीख आणि त्याच्या आसपासच्या दिवसाची हॉटेल बुकिंग झाली आहे.
याबाबत स्पंदना नावाच्या एका ट्विटर यूजर्सने प्रतिक्रिया व्यक्त केलीय. अहमदाबादमध्ये 24-25 जानेवारी रोजी कोणत्याही हॉटेलच्या रुमची किंमत 50 हजारापेक्षा कमी नाहीये. जर तुम्हाला पैसे वाचवायचे असेल तर वडोदरा येथे थांबा. त्यानंतर अहमदाबादला जा, असं स्पंदनाचं म्हणणं आहे. प्रीती जैन नावाच्या एका यूजर्सच्या म्हणण्यानुसार, अहमदाबादच्या एका हॉटेलमध्ये रात्रभर थांबण्यासाठी 53,200 द्यावे लागतात. तर मयुर जोशी नावाच्या व्यक्तीच्या मते, 25 जानेवारी रोजी होणाऱ्या कोल्डप्ले कॉन्सर्टमुळे अहमदाबादमधील हॉटेलांची किंमत दहापट वाढली आहे. हॉटेलची रुम बुक करणाऱ्या लोकांना शुभेच्छा.
यूजर्स भडकले
दुसऱ्या इतर इंटरनेट यूजर्सनेही हॉटेलच्या वाढत्या किंमतीवर संताप व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांनीही जानेवारीत होणाऱ्या कोल्डप्ले संगीत समारंभ आणि अन्य कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीबाबत सख्त पावलं उचलण्यास संबंधितांना सांगितलं आहे. ऑनलाइन तिकीट विक्रीतून फसवणूक होऊ नये म्हणून पावलं उचलण्यात आली आहेत.
9 वर्षानंतर भारतात
जगातील यशस्वी बँडमध्ये कोल्डप्ले बँडचं नाव आहे. यावर्षी जानेवारीत मुंबई आणि अहमदाबादमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोल्डप्ले रॉक बँड 9 वर्षानंतर भारतात परफॉर्म करणार आहे. या बँडने 2016मध्ये भारतात लाइव्ह कॉन्सर्ट केला होता. आता जानेवारी 2025 मद्ये या ब्रिटिश बँडचा परफॉर्मन्स होणार आहे.