सर्वात मोठा पक्ष एनडीएतून बाहेर, लोकसभा निडवणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का; साऊथमध्ये काय होणार?
लोकसभा निवडणुका तोंडावर असताना आणि इंडिया आघाडीचं मोठं आव्हान निर्माण झालेलं असतानाच भाजपला जोरदार धक्का लागला आहे. भाजपच्या मित्र पक्षाने भाजपची आणि एनडीएची साथ सोडली आहे. त्यामुळे दक्षिणेतील सर्व समीकरणे बदलणार आहेत.
चेन्नई | 26 सप्टेंबर 2023 : एकीकडे कर्नाटकातील जनता दल सेक्युलरला एनडीएत आणून भाजपने इंडिया आघाडीला चांगलीच चपराक दिली होती. त्यामुळे दक्षिणेत आम्ही मजबूत होत असल्याचंही भाजपने दाखवून दिलं होतं. पण भाजपचं हे स्वप्न क्षणभंगूरच ठरलं आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या ऑल इंडिया अण्णा द्रविड़ मुनेत्र कळघम (AIADMK)ने एनडीएची साथ सोडली आहे. अण्णाद्रमुकची सोमवारी बैठक पार पडली. त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. अण्णाद्रमुकने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याने दक्षिणेतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
अण्णाद्रमुकचे डेप्युटी कोऑर्डिनेटर केपी मुनुसामी यांनी एनडीएतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. आमची बैठक झाली. त्यात एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय सर्वसंमत्तीने घेतला आहे. आता आमचे भाजपशी काहीही संबंध असणार नाहीत. भाजपचं राज्यातील नेतृत्व आमच्या नेत्यांवर आणि आमच्या महासचिवांवर वारंवार अनावश्यक टीका करत आहे. अनेकदा सांगूनही भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्याला चाप दिला नाही. त्यामुळे आम्ही भाजपपासून वेगळं होण्याचा ठराव मंजूर केला आहे, असं मुनुसामी यांनी सांगितलं. अण्णाद्रमुकच्या या निर्णयामुळे आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तामिळनाडूत स्वबळावर मैदानात उतरावं लागणार आहे.
गेल्याच आठवड्यात घोषणा
अण्णाद्रमुकने गेल्याच आठवड्यात भाजप आणि एनडीएमधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काल झालेल्या पक्षाच्या बैठकीत सर्वसंमत्तीने तसा ठरावही मंजूर केला आहे. भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ही युती तोडत असल्याचं अण्णाद्रमुकने स्पष्ट केलं आहे.
अण्णामलाई काय म्हणाले होते?
अण्णामलाई यांनी 1950च्या एका घटनेचा उल्लेख करून तामिळनाडू सरकारमधील मंत्री पीके सेकर बाबू यांच्याविरोधात टीका केली होती. त्यावेळी अण्णादुरई यांनी हिंदू धर्मावर टीका केली होती. त्याला स्वातंत्र्य सैनिक पसुमपोन मुथुरामलिंगम थेवर यांनी जोरदार विरोध केला होता. त्यानंतर अण्णादुराई यांना माफी मागावी लागली होती, असं अण्णामलाई यांनी म्हटलं होतं.
द्रमुकचा पलटवार
अण्णामलाई यांच्या टीकेनंतर अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी जोरदार विरोध केला होता. आमच्या नेत्यांच्या विरोधात करण्यात आलेली टीका खपवून घेतली जाणार नाही. आम्ही एनडीएचा भाग असूनही आमच्या विरोधात टीका केली जात असेल तर आघाडीत राहण्यात काय अर्थ? असा सवाल अण्णाद्रमुक यांनी केला होता.