Asaduddin Owaisi: असदुद्दीन ओवैसींना पॅलेस्टाईनची घोषणा भोवणार, संसद सदस्यत्व जाण्याचा धोका, काय आहे नियम?
asaduddin owaisi: सर्वोच्च न्यायालयाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राष्ट्रपतींकडे ओवैसीसंदर्भात तक्रार केली आहे. भारतीय राज्य घटनेच्या नियम 102 आणि 103 नुसार ही तक्रार दिली आहे. त्यात त्यांचे संसद सदस्यत्व अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे नेता असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी नवा वाद निर्माण केला. लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेताना त्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिली. अर्थात ही घोषणा लोकसभेच्या पटलावरुन काढून टाकण्यात आली आहे. परंतु सत्ताधारी पक्षाकडून ओवैसी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच वकील हरिशंकर जैन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे तक्रार केली आहे. काय ओवैसी यांचे सदस्यत्व आता रद्द होऊ शकते…काय आहे तो नियम…
लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याचा धोका
संसद सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे निवडणूक लढवणारा व्यक्ती भारतीय नागरीकच हवा. तसेच शपथ घेताना त्यात स्पष्ट नमूद केले आहे की, ‘कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा असेल.’ आता ओवैसी यांनी शपथ घेताना दुसऱ्या देशाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे हा प्रकार संसद नियमाचे उल्लंघन करणारा आहे. नियमानुसार, ओवैसी यांनी दुसऱ्या देशासंदर्भात निष्ठा दाखवली आहे. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होऊ शकते.
काय आहे सदस्य अपात्रतेशी संबंधित नियम?
भारतीय राज्यघटनेच्या कलम १०२ अन्वये खासदारांना अपात्र ठरवण्याची तरतूद आहे. त्यासाठी खालील नियम आहेत.
- जर एखादा खासदार भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या लाभाचे पद धारण करत असेल तर त्याचे संसदेतील सदस्यत्व अपात्र ठरवले जाऊ शकते.
- एखाद्या सदस्याची मानसिक परिस्थिती योग्य नसेल आणि न्यायालयाने त्याला मानसिकदृष्ट्या अयोग्य घोषित केले आहे.
- एखाद्या सदस्याला दिवाळखोर घोषित केले गेले (तो व्यक्ती त्याचे कर्ज फेडू शकत नाही)
- जर तो भारताचा नागरिक नसेल, किंवा स्वेच्छेने इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व प्राप्त केले असेल किंवा इतर कोणत्याही देशाशी निष्ठा किंवा संलग्नता असेल.
- जर तो संसदेने बनवलेल्या कोणत्याही कायद्यानुसार अपात्र ठरला असेल.
यामधील चौथ्या नियमात स्पष्टपणे म्हटले आहे की, दुसऱ्या देशाशी निष्ठा ठेवल्यास त्याचे संसद सदस्यत्व जाऊ शकते. सत्ताधारी पक्ष या नियमाचा आधार घेत आक्रमक झाला आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे की, ओवैसी याच्या घोषणेसंदर्भात तक्रार मिळाली आहे. त्याबाबत नियमाची तपासणी केली जात आहे.
A complaint has been filed before the President of India against Mr. Asaduddin Owaisi in terms of article 102 and 103 of the constitution of india by Mr. Hari Shankar Jain seeking his disqualification as member of parliament. @rashtrapatibhvn @adv_hsjain
— Vishnu Shankar Jain (@Vishnu_Jain1) June 25, 2024
सर्वोच्च न्यायालयाचे वकील राष्ट्रपतींकडे
सर्वोच्च न्यायालयाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राष्ट्रपतींकडे ओवैसीसंदर्भात तक्रार केली आहे. भारतीय राज्य घटनेच्या नियम 102 आणि 103 नुसार ही तक्रार दिली आहे. त्यात त्यांचे संसद सदस्यत्व अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.