नवी दिल्ली : एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्ली येथील सरकारी बंगल्यावर अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. या दगडफेकीत ओवैसी यांच्या बंगल्याच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ओवैसी यांच्या घरी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे.
असदुद्दीन ओवैसी यांचा अशोका रोड येथे बंगला आहे. त्यांच्या बंगल्यावर रविवारी संध्याकाळी 5.30 वाजता अज्ञात व्यक्तीने दगडफेक सेली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ओवैसी यांच्या बंगल्याबाहेरून दगड जमा केले आहेत. तसेच ओवैसी यांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तसेच पोलिसांनी ओवैसी यांच्या बंगल्याबाहेरचे आणि बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने केलेल्या या दगडफेकीत कुणालाही कोणतीही दुखापत झाली नसल्याचं सांगण्यात आलं.
या घटनेनंतर ओवैसी यांनी दिल्ली पोलिसांना टॅग करत एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यावर त्यांनी आपली कमेंटही केली आहे. या व्हिडीओत ओवैसी यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत.
My Delhi residence has been attacked again. This is the fourth incident since 2014. Earlier tonight, I returned from Jaipur & was informed by my domestic help that a bunch of miscreants pelted stones that resulted in broken windows. @DelhiPolice must catch them immediately pic.twitter.com/vOkHl8IcNH
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 19, 2023
माझ्या दिल्ली येथील घरावर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. 2014नंतरची ही चौथी घटना आहे. मी जयपूरहून रात्री परतलो. तेव्हा माझ्या सहायकाने घरावर काही लोकांनी दगडफेक केल्याचं सांगितलं. या दगडफेकीत खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. तथाकथित हाय सेक्युरिटी क्षेत्रात हा हल्ला झाला ही चिंताजनक बाब आहे. मी पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलीस माझ्या निवासस्थानी दाखल झाले आहेत, असं ओवैसी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
माझ्या घरावरील हा चौथा हल्ला आहे. मी ज्या परिसरात राहतो. त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे आरोपींना तात्काळ पकडलं गेलं पाहिजे, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे. तसेच ओवैसी यांनी याबाबत पोलिसांना एक पत्रंही लिहिलं आहे.