NCP : झिरवळ, पाटील, भुजबळ यांच्या सुप्रीम कोर्टात याचिका, शरद पवार गटाला मोठा शह? काय होणार कोर्टात?
शिवसेना आणि राष्ट्रवादीतील प्रकरण साम्य असल्याने दोन्ही गटाने दोन्ही बाजूचे सेम वकील ठेवले आहेत. म्हणजे जे वकील शिंदे गटाची बाजू मांडत आहेत, तेच वकील अजितदादा गटाकडे आहेत. तर जे वकील ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत, तेच वकील शरद पवार गटाकडे आहेत...
संदीप राजगोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली | 13 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीतील संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. पण त्यापूर्वीच शरद पवार गटाला मोठा झटका बसला आहे. अजितदादा गटाच्या तीन आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. आमचंही म्हणणं कोर्टाने ऐकून घ्यावं, असं या याचिकेत अजितदादा गटाने म्हटलं आहे. त्यामुळे कोर्टासमोर अजितदादा गटाला बाजू मांडायला मिळते की नाही हे पाहावं लागणार आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात दोन याचिकांवर सुनावणी होती. एक शिवसेनेच्या आणि दुसरी शरद पवार गटाच्या. शिवसेनेची याचिका ठाकरे गटाने कोर्टात दाखल केली आहे. तर शरद पवार गटाची याचिका जयंत पाटील यांनी दाखल केलेली आहे. विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेसंबंधी लवकरात लवकर निर्देश द्यावे, अशी मागणी या याचिकेतून शरद पवार गटाने केली आहे. या याचिकेत शरद पवार गटाने फक्त विधानसभा अध्यक्षांना पार्टी केलं आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच अजितदादा गटाकडून हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
आमचंही ऐका
अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात तीन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. छगन भुजबळ, नरहरी झिरवळ आणि अनिल पाटील यांनी या याचिका दाखल केल्या आहेत. आमचंही म्हणणं ऐकून घ्यावं. आमचीही भूमिका समजून घ्यावी, अशी विनंती या हस्तक्षेप याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे कोर्टाने अजितदादा गटाला बाजू मांडण्यास संधी दिल्यास ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोर्टा हस्तक्षेप करणार नाही
या संपूर्ण प्रकरणावर वकील सिद्धार्थ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जयंत पाटील सर्वोच्च न्यायालयात आले होते. अजितदादा गटाच्या आमदारांच्या निलंबनाची प्रक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे प्रलंबित आहे.त्याला एक्सपेडाईट करायला त्यांना निर्देश द्या, अशी विनंती जयंत पाटील यांनी कोर्टाला केली आहे. कारण नार्वेकरच आमदारांची अपात्रता ठरवणार आहे. तेच ठरवू शकतात.
सर्वोच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यात जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना पार्टी केले होते. अजितदादा गट पार्टी नव्हता. त्यामुळे अजितदादा गटाने तीन याचिका दाखल केल्या आहेत. हस्तक्षेप याचिका. त्यात नावं महत्त्वाचे आहेत. अनिल पाटील हे अजितदादा गटाचे आताचे प्रतोद आहेत. नरहरी झिरवळ विधानसभा उपाध्यक्ष आहेत आणि छगन भुजबळ हे एक आहेत, असं सिद्धार्थ शिंदे म्हणाले.
तीन वकील बाजू मांडणार
तीन याचिका दाखल झाल्या म्हणजे तीन वकील बाजू मांडतील. घाई करण्याची गरज नाही. निवडणूक आयोगाकडे प्रकरण सुरू आहे. अध्यक्षांकडे एकदीड महिन्यांपूर्वीच याचिका दाखल केली आहे असंच अजितदादा गटाचं म्हणणं असेल. शिवसेनेबरोबर आमचं क्लब करू नका. आमचं वेगळं प्रकरण ठेवा असंही त्यांना म्हणायचं असेल. त्यामुळेच ही याचिका दाखल करण्यातआली असावी, असं शिंदे यांनी सांगितलं.
हस्तक्षेप याचिकेवर सुनावणी होईल. या याचिका मॅटरमध्ये घ्यायच्या की नाही हे कोर्ट ठरवेल. क्लब केलेल्या याचिकांवर दादा गटालाही भूमिका मांडायला वेळ मिळेल, असंही ते म्हणाले.