Delhi Alert: स्वातंत्र्यदिनासाठी दिल्लीत अलर्ट, दहशतवादी हल्ल्याची शक्यता, उ. प्रदेशात एक दहशतवादी अटकेत, पंजाबातही कारवाई
दहशतवादी संघटनांचे अनेक कट, योजना प्रत्यक्षात येण्यापूर्वीच मोडून काढण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर, उ.प्रदेश, पंजाब आणि आता दिल्लीतही याबाबतच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. घातपाताच्या कारवाया रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
नवी दिल्ली – अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनावर (Independence day)अद्यापही दहशतीचं सावट आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात साजरा होत असताना, देशात दहशतवादी हल्ले (terrorist attack)घडवून अशांतता निर्माण करण्याचा काही दहशतवादी संघटना आणि समाजकंटकांचा प्रयत्न आहे. मात्र सतर्क असलेल्या गुप्तचर यंत्रणा आणि सक्षम सुरक्षा दलांमुळे ( IB)आत्तापर्यंत या समाजविघातक योजना पूर्णत्वास जाऊ शकलेल्या नाहीत. दहशतवादी संघटनांचे अनेक कट, योजना प्रत्यक्षात येण्यापूर्वीच मोडून काढण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर, उ.प्रदेश, पंजाब आणि आता दिल्लीतही याबाबतच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. घातपाताच्या कारवाया रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
15 ऑगस्टसाठी दिल्लीत अलर्ट
गुप्तचर यंत्रणांनी 15 ऑगस्टसाठी अलर्ट जारी केला आहे. स्वातंत्र्यदिनी दिल्लीत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अहवालात जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबासारख्या संघटना हल्ला घडवून आणण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएसआयने या दोन्ही संघटनांना हल्ला करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती आहे. दिल्लीसह इतर 4 राज्यांत मोठी कारवाई करण्यात आली आहे.
1. दिल्लीत दोन बांग्लादेशी अटकेत, 10 बनावट स्टॅम्पही जप्त
रविवारी दिल्ली पोलिसांनी दोन बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पासपोर्ट आणि बांग्लादेश मंत्रालयाचे बनावट 10 स्टॅम्प जप्त केले आहेत. मोहम्म्द मुस्तफा आणि मोहम्द हुसैन अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांचीही चौकशी करण्यात येते आहे. स्वातंत्र्यदिनापूर्वी नवी दिल्लीत विशेष तापसणी अभियान राबवण्यात येत आहे. त्याच काळात मिळालेल्या माहितीच्या आधाराने या बांग्लादेशी नागरिकांना एका घरातून अटक करण्यात आली आहे. दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी आनंद विहार परिसरातून हत्यारांची तस्करी करणाऱ्या गँगमधील सहा जणांना अटक केली आहे.
2 . उ. प्रदेशात आणखी एका जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याला अटक
उत्तरप्रदेश एटीएसने आणखी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. फतेहपूरमध्ये अटक करण्यात आलेला हबीबुल हा सहारनपूरमध्ये पकडलेल्या दहशतवादी नदीम याचा साथीदार होता. 19 वर्षंचा हबीबुल हा जैश ए मोहम्मद आणि इतर काही दहशतावादी संघटनांशी संबंधित होता. व्हर्च्युअल आयडी तयार करण्यात त्याचे प्रावीण्य आहे.
3. पंजाबात दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड
पंजाब पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने रविवारी आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या समर्थन करणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणात कॅनडात राहाणारा अर्श डल्ला, ऑस्ट्रेलियातील गुरजंत सिंह यांच्याशी संबंधित चार एजंटंना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 ग्रेनेड, एक आईडी, दोन बंदुका आणि 40 काडतूसे तप्त करण्यात आली आहेत.
4. आसाममध्ये उल्फाचा एक आणि मणिपूरमध्ये सात उग्रवाद्यांना अटक
असामच्या चराईदेव जिल्ह्यातील सोनारी येथून उल्फा या संघटनेशी संबंधित एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक बंदूक आणि इतर हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. तर मणिपूरमध्ये बंदी घालण्यात आलेल्या पीपुल्स लिबरेशन आर्मीच्या सात उग्रवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पिस्तुले, ग्रेनेडसह इतर हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत.