दिल्ली: ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) आणि सुल्तान मशिदीवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (Muslim Personal Law Board ) तातडीची बैठक बोलावली आहे. आजच ही बैठक होत आहे. या बैठकीत दोन्ही मशिदींबाबतच्या वादावर चर्चा होणार असून देशातील इतर विषयांवरही चर्चा होणार आहे. त्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आज होणाऱ्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारीणीच्या मिटिंगकडे अवघ्या देशाचं लक्ष वेधलं गेलं आहे. दरम्यान, ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात (supreme court) गेला आहे. मुस्लिम पक्षकारांनी मशिदीच्या सर्व्हेला विरोध करणारी याचिका कोर्टात दाखल केली होती. त्यावर थोड्याच वेळात 4 वाजता निकाल येणार आहे. तसेच वारणासी कोर्टाने मात्र, ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेसाठी दोन दिवसांचा अवधी वाढून दिला आहे. या मशिदीचा सर्व्हे फक्त 50 टक्के झाला होता. ऊर्वरीत सर्व्हे करण्यासाठी कोर्ट कमिश्नरने दोन दिवसांचा अवधी वाढवून मागितला होता.
वाराणासी कोर्टात सर्व्हे रिपोर्ट दाखल करण्याबाबत सुनावणी झाली. याचिकाकर्ते सीता साहू, मीनू व्यास आणि रेखा पाठक यांनी कथित शिवलिंगच्या चारही बाजूला बनलेली भिंत हटवण्याची मागणी केली आहे. शिवलिंगाच्या चारही बाजूची भिंत हटवण्यात यावी. कारण शिवलिंगाला सिमेंट आणि दगडांमध्ये गडप केलं असावा, असा संशय या याचिकेत व्यक्त करण्यात आला आहे.
या महिलांनी ज्ञानवापीच्या पश्चिमेकडील भिंतीत बनलेला एक बंद दरवाजा उघडण्याची मागणी केली आहे. हा रस्ता माँ श्रृंगार गौरीच्या दिशेने जातो. शिवलिंगापर्यंत पोहोचण्यासाठी पूर्वेकडील दरवाजा उघडून प्रवेश देण्यात आला आहे, असं हिंदू पक्षकारांनी म्हटलं आहे.
All India Muslim Personal Law Board calls an urgent meeting of its executive committee on 17th May. The current issues of the country, including Gyanvapi Masjid, Tipu Sultan Masjid, and other issues will be discussed. The Board will decide its future course of action.
— ANI (@ANI) May 17, 2022
वजूखानाच्या (हातपाय धुण्याची जागा) खाली पूर्वेकडे जाण्यासाठी दरवाजा आहे. मात्र, तिथे मातीचा प्रचंड ढिगारा पडला आहे. तो हटवला गेला पाहिजे, असा दावा हिंदू पक्षाने केला आहे. तसेच या ठिकाणचा वजूखाना आणि शौचालय इतरत्रं शिफ्ट करण्याची मागणी फेटाळून लावण्याची मागणी करण्यात आली आहे. मला भिंत तोडण्याचा अधिकार नाही. एका व्हिडिओग्राफरने मीडियाशी संवाद साधला आहे. त्यामुळे गोपनियतेचा भंग होऊ शकतो. असं अॅडव्होकेट कमिश्नर अजय कुमार मिश्रा यांनी सांगितलं आहे.
यावेळी आयुक्तांनी रिपोर्ट सबमिट करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मागितला आहे. मशीद सर्व्हेचा अहवाल 50 टक्केच पूर्ण झाला आहे. सर्व्हे रिपोर्ट तयार आहे. पण त्यात काही सुधारणा करायच्या आहेत. त्यासाठी दोन दिवस लागतील. त्यामुळे आता कोर्ट कमिश्नरची मागणी आणि हिंदू पक्षाच्या वकिलांच्या मागणीवर थोड्याच वेळात कोर्ट फैसला देणार आहे. मशिदीतील पूर्वेकडील भिंत तोडणे आणि शिवलिंगाच्या आसपासचा ढिगारा हटवण्यासाठीच्या याचिकेवर सुनावणी झाली. थोड्याच वेळात कोर्ट त्यावर फैसला देणार आहे, अशी माहिती हिंदू पक्षकारांच्या वकिलांनी दिली.