प्राध्यापकाची बेताल बडबड… प्रभू राम आणि श्रीकृष्णाविरोधातील वादग्रस्त विधानाने खळबळ
अलाहाबाद विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. विक्रम यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच हिंदू संघटनांनी या विधानावर संताप व्यक्त करत निषेध नोंदवला आहे.
लखनऊ | 23 ऑक्टोबर 2023 : प्रभू राम आणि श्रीकृष्णावर अलाहाबाद विद्यापाठीचे असिस्टंट प्राध्यापाक डॉ. विक्रम हरिजन यांनी सोशल मीडियावरून वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बेताल आणि वादग्रस्त विधान करणाऱ्या या प्राध्यापकावर प्रयागराज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणअयात आला आहे. डॉ. विक्रम हरिजन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक हिंदू संघटनांनी केली आहे. तसेच या प्राध्यापकाच्या विधानावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
प्राध्यापक डॉ. विक्रम यांनी दुसऱ्यांदा हे बेताल विधान केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी थेट प्रभू राम आणि श्रीकृष्णावर वादग्रस्त विधान केलं आहे. आज प्रभू राम असते तर ऋषी शंभुकाचा खून केल्याबद्दल आयपीसीच्या 302 अंतर्गत तुरुंगात टाकलं असतं. तसेच कृष्ण असते तर महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांनाही तुरुंगात टाकलं असतं, अशी धक्कादायक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. 22 ऑक्टोबर रोजी त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे हिंदू संघटनांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी विक्रम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहेत विक्रम?
डॉ. विक्रम हे अलाहाबाद विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत. ते मध्यकालीन इतिहास शिकवतात. ते या विद्यापीठात असिस्टंट प्राध्यापक आहेत. त्यांनी श्रीराम आणि श्रीकृष्णावर वादग्रस्त विधान केल्यानतंर विश्व हिंदू परिषद, हिंदू जागरण मंच आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमध्ये आक्रोश आहे. हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कर्नल गंज पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच लिखीत तक्रारही नोंदवली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिसांनीही विक्रम यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
विक्रम यांनी सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी या तिन्ही संघटनांची मागणी आहे. तर, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या तक्रारीनंतर आम्ही गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे, असं कर्नलगंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोविंद यादव यांनी सांगितलं.
विधानावर ठाम
दरम्यान, आपल्या विधानावर आपण ठाम असल्याचं डॉ. विक्रम यांनी म्हटलं आहे. मी इतिहासाचा शिक्षक आहे. पुस्तके वाचतो. पुस्तक वाचूनच मी ती पोस्ट लिहिली आहे, असं विक्रम यांनी म्हटलं आहे. यापूर्वीही त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.