ज्ञानवापी मशिदीत शिवलिंगाच्या पूजेला परवानगी द्या, महंतांनी मागितली परवानगी, सोमवारी याचिका दाखल होणार
सापडलेल्या शिवलिंगाची पूजा दररोज व्हावी, यासाठी तिथे पूजेला परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे. याबाबतची याचिका वाराणसी जिल्हा कोर्टात सोमवारी दाखल करण्यात येणार असून, याबाबत लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
वाराणसी – ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi raw )सर्वेवरुन जिल्हा कोर्टात आणि सुप्रीम कोर्टात सुनावण्या सुरु असताना, आता या प्रकरणात नवा वाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग (shivling)सापडल्याचा दावा हिंदू पक्षकरांनी केला आहे. तर हे शिवलिंग नसून कारंजा असल्याचे मुस्लीम पक्षकरांचे म्हणणे आहे. तूर्तास या जागेत कुणीही जाऊ नये आणि ही जागा सुरक्षित ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. आता सापडलेल्या शिवलिंगाची पूजा (worship permission)दररोज व्हावी, यासाठी तिथे पूजेला परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे. याबाबतची याचिका वाराणसी जिल्हा कोर्टात सोमवारी दाखल करण्यात येणार असून, याबाबत लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
महंत डॉ. कुलपती तिवारी यांची याचिका
काशी विश्वेश्वर मंदिराचे माजी महंत डॉ. कुलदीप तिवारी यांनी सांगितले आहे की, ज्ञानवापी मशिदीत जे शिवलिंग सापडले आहे, त्याची नियमित पूजा होणे गरजेचे आहे. या शिवलिंगाच्या पुजेला परवानगी मिळावी यासाठी २३ मे रोजी याचिका दाखल करणार असल्याचेही तिवारी यांनी सांगितले आहे. इतक्या मोठ्या कालावधीनंतर जर बाबा भोलेनाथ सापडले असतील, तर त्यांची दररोज पूजा अर्चना होणे गरजेचे आहे. हे झाले नाही तर शिवभक्तांना दुख होईल.
साग्रसंगीत पूजाअर्जा करण्यासाठी मागणार परवानगी
भोलेबाबांच्या शृंगार, नैवेद्य,अभिषेक, स्वच्छता,पूजापाठ करण्याचे अधिकार मिळावेत अशी मागणी या याचिकेतून करण्यात येणार आहे. आता ही याचिका जिल्हा न्यायालय स्वीकारणार का आणि यावर काय निर्णय होणार, हे सोमवारी पाहावे लागेल.
सोमवारी इतर याचिकांवरही होणार सुनावणी
मा शृंगार देवी आणि ज्ञानवापी प्रकरणात सोमवारी जिल्हा न्यायालयात, डॉ. अजय कृष्णा विश्वेश यांच्या कोर्टात सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील हिंदू महिला याचिकाकर्त्या, इंतजामिया मसाजिद कमिटी यांच्या विनंती अर्जावर सोमवारी सुनावणी होणे अपेक्षित आहे.
वाराणसी जिल्हा न्यायालयाकडे ८ आठवड्यांचा कालावधी
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, या प्रकरणात जिल्हा न्यायाधीशांनी ८ आठवड्यांत सुनावणी पूर्ण करावी, असे आदेश दिले आहेत. तोपर्यंत शिवलिंग सापडलेली जागा सुरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मुस्मांनाही नमाज पढण्यास रोखू नये असेही सांगण्यात आले आहे. नमाजासाठी केवळ २० जणांची मर्यादाही हटवण्यात आली आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका–पोलीस
हिंदू आणि मुस्लीम पक्षकारांशी सातत्याने पोलीस संपर्कात आहेत. दोन्ही पक्षकरांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणात कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलीस आय़ुक्त ए. सतीश गणेश यांनी केले आहे.