Mamata Banerjee | ‘मी त्यांच्या वक्तव्याच कौतुक करते’, ममता बॅनर्जींकडून भाजपाच्या मुख्यमंत्र्यांची प्रशंसा
Mamata Banerjee | भाजपाच्या कडव्या टीकाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी दंगली दरम्यान भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका वक्तव्याच समर्थन केलय.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी या भाजपाच्या कडव्या टीकाकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी भाजपाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं कौतुक केलय. सध्या मनोहर लाल खट्टर मुख्यमंत्री असलेल्या हरियाणामध्ये जातीय तणावाची स्थिती आहे. नूंहमध्ये संघर्ष झाला, त्यानंतर राज्यात हिंसाचार झाला. त्या बद्दल मनोहर लाल खट्टर यांना प्रश्न विचारण्यात आला. प्रत्येकाला संरक्षण देणं सरकारला शक्य नाहीय, असं खट्टर म्हणाले.
पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन भाजपाकडून सातत्याने ममता बॅनर्जी यांना टार्गेट केलं जातं. देशाची एक नागरिक या नात्याने मनोहर लाल खट्टर यांच्या वक्तव्याच मी कौतुक करते, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
“एक राजकारणी म्हणून नाही, देशाची एक नागरिक म्हणून मी मनोहर लाल खट्टर यांचं वक्तव्य विचारात घेतलं. सरकार प्रत्येकाला सुरक्षा पुरवू शकत नाही, हे वास्तव आहे, म्हणून मी त्यांच्या स्टेटमेंटच कौतुक करते” असं ममता बॅनर्जी पत्रकार परिषदेत म्हणाल्या. हरयाणामधील हिंसाचारासाठी ममता बॅनर्जी यांनी भाजपाला जबाबदार धरलय.
‘तणावाला प्रोत्साहन देऊ नये’
“सरकारने जातीभेद आणि जातीय तणावाला प्रोत्साहन देऊ नये. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा जात आणि पंथाच्या आधारावर फूट पाडण्याचा घाणेरडा खेळ खेळतय. त्यामुळे हा जातीय तणाव निर्माण झाला आहे” असं बॅनर्जी म्हणाल्या. हरयाणाच्या नूंहमध्ये आणि अन्य जिल्ह्यात झालेल्या जातीय हिंसाचारात सहाजणांचा मृत्यू झाला. यात दोन होम गार्डचे जवान आहेत. मुख्यमंत्री खट्टर यांनी शांततेच आवाहन केलय. जातीय हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही असं त्यांनी म्हटलय.