WITT Satta Sammelan | ‘उद्धव ठाकरे यांना मुलाला मुख्यमंत्री करण्याची चिंता, इंडिया आघाडी आहे कुठे?’; अमित शाह यांचा जोरदार टोला
"उद्धव ठाकरे यांना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय, स्टॅलिन यांनाही मुलगा मुख्यमंत्री व्हावा वाटतोय. ममता बॅनर्जी यांनाही भाचीला सत्तेत आणायचं आहे. लालूंनाही तेच करायचं आहे. यात आघाडी कुठे आहे?", असा सवाल अमित शाह यांनी केला.
नवी दिल्ली | 27 फेब्रुवारी 2024 : “इंडिया आघाडी नव्हतंच. ते मीडियाचं क्रिएशन होतं. मी देशातील लोकांना सांगतो. कुठेच इंडिया आघाडी झालं नाही. इंडिया आघाडीतील दोन सदस्य केरळात निवडणूक लढत होते. पश्चिम बंगलमध्ये लढत होते. महाराष्ट्रात फूट पडली. पंजाबमध्ये आता झालं आहे. इतर ठिकाणी कुठेच नाही. एखाद्या सिद्धांताच्या आधारेवर चालणारा पक्ष असेल तर आघाडी टिकते. पण सत्तालोलूप पक्षांची ही आघाडी होती. मुलांना, स्वताला मुख्यमंत्री पंतप्रधान बनण्यासाठी ते निघाले होते. त्यांना भारताचं काही पडलं नाही. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत हेच सोनिया गांधींचं लक्ष आहे. २१वेळा त्यांनी प्रयत्न केले. आताही त्यांचा तोच प्रयत्न आहे”, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. टीव्ही9 नेटवर्कच्या व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलनात ते बोलत होते
“उद्धव ठाकरे यांना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय, स्टॅलिन यांनाही मुलगा मुख्यमंत्री व्हावा वाटतोय. ममता बॅनर्जी यांनाही भाचीला सत्तेत आणायचं आहे. लालूंनाही तेच करायचं आहे. यात आघाडी कुठे आहे. या लोकांना आपल्या कुटुंबाला सत्तेत आणायचं आहे. त्यासाठी हा परिवारवादी जमावडा आहे. संत्र्यासारखी आघाडी आहे. या संत्र्याची एक एक पाकळी निघून जाणार आहे. २०२४च्या निकाल येताच सर्व पळून जातील. मतमोजणीच्या दिवसापासूनच यांच्यात फूट पडेल. राहुल गांधी नेते नसते तर आम्ही जिंकलो असतो असं सर्व म्हणतील”, अशीदेखील टीका अमित शाह यांनी केली.
उद्धव ठाकरेंना पुन्हा सोबत घ्याल का?
यावेळी अमित शाह यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची परत यायची इच्छा असेल तर सोबत घ्याल का? “यामध्ये जर-तर नसतं. काहीच टायटल निघणार नाही. थेट निवडणुकीच्या मुद्द्यावर या. नाहीतर तुमचा वेळ इथेच संपून जाईल”, असं म्हणत अमित शाह यांनी त्यावर उत्तर देणं टाळलं.
‘मला तुमचीही गरज’
याबाबत एका दुसऱ्या प्रश्नावर अमित शाह यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. पण त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून असं म्हटलं नाही. “मला तुमचीही गरज आहे. तुम्ही ज्वाईन करा. आमचा पक्ष परिवार नियोजन मानते. पक्षातील कार्यकर्त्याचं परिवार नियोजन मानत नाही. भाजपच्या अजेंड्याशी जे सहमत आहेत त्या सर्वांचं भाजपात स्वागत आहे. आमच्या अजेंड्यावर चालायचं आहे फक्त”, असंदेखील अमित शाह यावेळी म्हणाले.