एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर अमित शाह पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, त्यांच्या नाराजीचं…
राज्यातील महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर अमित शाह यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिंदे यांच्या नाराजीत कोणतेही तथ्य नाही, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाची निवड आधीच ठरलेली असल्याने नाराजीचं कोणतंही कारण नव्हतं, असा अमित शाह यांचा दावा आहे.
राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आपल्यालाच मुख्यमंत्रीपद मिळेल असं एकनाथ शिंदे यांना वाटत होतं. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रयत्नही केले होते. पण त्यांच्या पदरी निराशा पडली. मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने एकनाथ शिंदे नाराज झाले होते. चार पाच दिवस ते मीडियासमोर आलेच नव्हते. मीडियासमोर आल्यानंतरही शिंदे नाराजच होते. शिंदे गटाच्या नेत्यांकडूनही सूचक विधानं केली जात होती. त्यामुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, 10-11 दिवसाच्या नाराजीनंतर अखेर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या दिवशी शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर भाष्य केलं आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे यांचं नाराज असण्याचं काही कारण नव्हतं. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री निवडायचा हे आधीच ठरलं होतं. त्यामुळे नाराजीचं कारण असूच शकत नाही, असं अमित शाह यांनी सांगितलं जातं. मागच्यावेळी शिंदे मुख्यमंत्री होते. आमच्याकडे अधिक संख्या होती. तरीही आम्ही शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं. त्यांच्या पाठी आम्ही पहाडासारखे उभे राहिलो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
म्हणून कौल मिळाला
महाराष्ट्रातील निवडणूक निकालावरही त्यांनी भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीत भाजपला मेजॉरिटी मिळाली होती. शिवसेना ज्या जागांवर लढली होती, त्या ठिकाणी आम्ही जिंकू शकत नव्हतो. उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत विश्वासघात केला. लोकांनी ही गोष्टही मनात ठेवली. त्यानंतर अडीच वर्ष आमच्या सरकारने जी मेहनत केली, नरेंद्र मोदी सरकारने 10 वर्ष जे काम केलं तेही जनतेने लक्षात ठेवलं आणि महाराष्ट्रात आम्हाला कौल दिला, असं अमित शाह यांनी सांगितलं.
2026पर्यंत नक्षलवाद संपणार
नक्षलवादाच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 31 मार्च 2026च्या आधी भारत नक्षलवादी मुक्त करू. हा माझा विश्वास आहे. अनेक वर्षांपासूनची ही समस्या आहे. आज महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश या नक्षलवादातून बाहेर पडला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. एका वर्षाच्या आत आम्ही नक्षलवाद्यांची 70 टक्के स्ट्रेंथ संपवली आहे. हाच फरक भाजप आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये आहे. आम्ही व्होट बँकेचं राजकारण करत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
बांगलादेशावर काय म्हणाले?
बांगलादेशींच्या घुसखोरीवरही त्यांनी भाष्य केलं. 96 टक्के सीमा फेसिंग झाली आहे. चार टक्के बॉर्डर उघडी आहे. नदी, नाले आणि ओबधधोबड रस्ते आहेत. त्या ठिकाणी फेसिंग होऊच शकत नाही. अशा ठिकाणची गावे आम्ही निश्चित केली आहेत आणि त्यांची नावे सरकारांना पाठवली आहेत. कोणी रेशन कार्ड, आधारकार्ड बनवायला येत असेल तर त्यांची योग्य चौकशी करण्यास सांगितलं आहे, असं ते म्हणाले.
काय करत आहेत पोलीस?
बांगलादेशींची घुसखोरी आम्ही ओडिशात रोखली आहे. आसाममध्ये रोखली आहे. बंगाल आणि झारखंडमध्ये अजून घुसखोरी होत आहे. त्या ठिकाणचे सरकार त्यावर काम करत नाही. उलट आमच्यावर आरोप ठेवत आहे. पटवारी आणि पोलीस काय करत आहेत? राज्याची सुरक्षा ही राज्याची जबाबदारी नाही का? अशा प्रकारची खालच्या स्तराचं राजकारण आम्ही कधी पाहिलं नाही, असा हल्लाच त्यांनी चढवला.