पोलिसांना गुंगारा देण्यासाठी अमृतपाल सिंग याने लूक बदलला; जीन्स, टीशर्टवाला अमृतपाल ‘या’ गेटअपमध्ये दिसला
अमृतपाल सिंग याला आज सकाळी पंजाबच्या मोगा पोलिसांनी अटक केली आहे. कधीकाळी जीन्स टीशर्टमध्ये असणाऱ्या अमृतपालने आपला गेटअप बदलला आहे. पोलिसांनी ओळखू नये म्हणून त्याने गेटअप बदलल्याचं सांगितलं जात आहे.
चंदीगड : तब्बल 36 दिवसानंतर पंजाब पोलिसांनी खालिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला अटक केली आहे. मोगा येथील रोडेवाल गुरुद्वारातून त्याला अटक करण्यात आली आहे. नेहमी जीन्स पँट आणि टीशर्टमध्ये असणाऱ्या अमृतपालचा नव्या गेटअपमधील फोटो समोर आला आहे. या फोटोत अमृतपाल अजिबात ओळखला जात नाहीये. त्याच्या डोक्यावर पगडी असून कमरेला कृपाण आहे. तसेच तो अनवाणी चालताना दिसत आहे. या नव्या लूकमध्ये त्याला ओळखणं कठिण जात आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठीच त्याने हा नवा लूक केल्याचं सांगितलं जात आहे.
या फोटोत अमृतपाल गुरुद्वाराच्या बाहेर उभा असलेला दिसत आहे. त्याने ऑरेंज कलरची पगडी परिधान केली आहे. अंगात पांढरा शुभ्र कुर्ता आहे. कमरेला कृपाण असून गळ्यात सफेद गमछा आहे. त्याने पायात चप्पल किंवा बूट घातलेले नाहीयेत. तो अनवाणीच फिरताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला पांढरे कपडे घातलेले लोक आहेत. साध्या वेषातील हे पोलीस असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी अमृतपाल निळ्या पगडीत दिसत आहे.
पोलिसांचं आवाहन
मोगा पोलिसांनी त्याला मोगामधून अटक केली आहे. अमृतपाल याचे प्रचंड समर्थक आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी ट्विट करून नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. कोणीही अफवा पसरवू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
प्रवचनही दिलं
अमृतपाल सिंग याने काल रोडेवाल गुरुद्वारात प्रवचन दिलं होतं. अंत नाही सुरुवात आहे, असं त्याने या प्रवचनात म्हटलं होतं. गुरुद्वारात प्रवचन दिल्यानंतर त्याने पोलिसांकडे शरणागती पत्करली होती. मात्र, पोलिसांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. त्याला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याला आज सकाली 7 वाजता ताब्यात घेतलं. आता त्याला आसामच्या डिब्रुगड तुरुंगात ठेवण्यात येणार आहे.