राष्ट्रवादीनंतर आणखी एक पक्ष NDA मध्ये सहभागी होणार? या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याने चर्चा
AP CM Jagan Delhi Visit : एनडीएमध्ये आणखी एक पक्ष सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याने एनडीएची ताकद वाढली आहे.
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी ( YS Jagan Mohan Reddy ) 4 जुलै रोजी दिल्ली दौऱ्यावर येणार आहे. दिल्लीत दोन दिवसांच्या मुक्कामात जगनमोहन रेड्डी हे पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याची माहिती आहे. यासोबतच ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जलशक्ती गजेंद्र शेकावत तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह इतर केंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेणार आहेत. वायएसआर काँग्रेस एनडीएमध्ये सामील होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण याबाबत पक्षाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री ( Chief Minister of Andhra Pradesh ) जगन मोहन रेड्डी यांनी राज्यात एकहाती सत्ता मिळवली होती. वायएसआर रेड्डी यांचे 2009 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. पण आता जगन मोहन रेड्डी यांना इतर राज्यात देखील पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे ते भाजपच्या मदतीने पक्षाचा विस्तार करण्याचा विचार करत असल्याचं देखील बोललं जात आहे.
भाजपसोबत युती करणार?
जगन मोहन रेड्डी यांना दक्षिण भारतात भाजपसोबत ( BJP ) युती करायची आहे. पण राज्यात भाजपने टीडीपी सोबत युती करु नये अशी देखील त्यांची इच्छा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने चांगली कामगिरी केली, जिथे YSRCP ने 175 पैकी 151 जागा जिंकल्या. पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांना एकही संधी सोडायची नाही.
दक्षिण भारतात भाजपकडून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. भाजप तेलंगणा आणि केरळवर लक्ष केंद्रित करत आहे. तेलंगणातील केसीआर आणि डीएमकेचे स्टॅलिन यांचं वर्चस्व कमी करुन भाजपला जगनमोहन रेड्डी यांचं दक्षिणेतील महत्त्व वाढवायचं आहे. ज्याचा फायदा त्यांना राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात होईल. सध्या जगन मोहन रेड्डी हे आंध्रप्रदेशपुरते मर्यादित असून केंद्रात त्यांची तेवढी पकड नाही. एडीएमके अडचणीत आहे आणि डाव्यांचा भाजपशी कडवा संघर्ष सुरू आहे. चंद्राबाबू नायडू यांनी आधीच एनडीएसोबतचे संबंध बिघडवले आहेत. अशा परिस्थितीत दक्षिणेतील रेड्डी हे एकमेव नेते आहेत जे भाजपसाठी अनुकूल ठरु शकतात.
अनेक वेळा भाजपला पाठिंबा
वायएसआरसीपीने संसदेत अनेक वेळा भाजपला पाठिंबा दिलाय. द्रौपदी मुर्मूच्या बाबतीतही त्यांनी लगेच भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. आंध्र प्रदेशचे हित सुनिश्चित करण्यासाठी भाजपला पाठिंबा दिला असं पक्षाकडून सांगितलं जातं. त्यातच आता मुख्यमंत्री जगहमोहन रेड्डी हे दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेणार असल्याने ते एनडीएमध्ये सहभागी होणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात समान नागरी कायदा विधेयक मांडलं जावू शकतं. त्यामुळे कोणकोणते पक्ष भाजपला पाठिंबा देणार याकडे ही सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. त्याआधी ही भेट होणार असल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.