Bageshwar Baba : जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत… ; बागेश्वर बाबा यांनी डंके की चोटपर काय सांगितलं?
आम्ही डंके की चोटपर दरबार भरवत असतो. आम्ही आमच्या गुरुचा प्रचार करतो. आम्ही चमत्कारी नाही. ईश्वर नाही. आम्ही कोणी संत नाही. फक्त आपल्या गुरुंचं ध्यान लावतो आणि भक्तांसमोर आपलं म्हणणं मांडतो.
रायपूर: अनोळखी व्यक्तीचं नाव, गाव ओळखण्याची सिद्धी प्राप्त झालेल्या बागेश्वर बाबा ऊर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पुन्हा नवं आव्हान दिलं आहे. बागेश्वर बाबांवर अंधश्रद्धा फैलावत असल्याचा आरोप आहे. आमच्यावर अंधश्रद्धा फैलावल्याचा आरोप करणारे लोक येत राहतील. बागेश्वर बालाजीच्या मंदिरात लाखो लोक येत असतात. पण सनातन धर्मावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना समाजातून बहिष्कृत केलं जाईल, असा इशारा या बागेश्वर बाबांनी दिला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला आहे.
माझ्याजवळ कोणतीही बंद खोली नाही. ज्या लोकांनी मला आव्हान दिलं आहे, त्यांनी स्वत: इथे येऊन पाहावं. माझ्या शब्द आणि कार्याला कोणीही कॅमेऱ्यात आव्हान देऊ शकतं. परंतु, इथे लाखो लोक येतात आणि बागेश्वर बालाजीच्या दरबारात बसतात. मला जे वाटेल ते मी लिहिल. मी जे लिहिल ते सत्यच होईल. माझा माझ्या देवावर विश्वास आहे, असं बागेश्वर बाबांनी सांगितलं.
हिंदूना मूळ धर्मात आणू
मी ईश्वर, माझे गुरु आणि सनातन धर्मातील मंत्राच्या शक्तीने कौशल्य प्राप्त केलं आहे. सर्वांनी त्याचा अनुभव घ्यावा. हीच सत्य सनातन धर्माची उद्घोषणा आहे. सनातन धर्माच्या विरोधात बोलणाऱ्यावर बहिष्कार घातला जाईल. काही लोक गोंधळ निर्माण करत आहेत. त्यांना धडा शिकवला जाईल. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत सर्व सनातनी हिंदूंना त्यांच्या मूळ धर्मात परत आणेन, असं ते म्हणाले.
मी चमत्कारी नाही
बागेश्वर बाबांनी काल टीव्ही9 भारतवर्षशी काल संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली होती. आम्ही डंके की चोटपर दरबार भरवत असतो. आम्ही आमच्या गुरुचा प्रचार करतो. आम्ही चमत्कारी नाही. ईश्वर नाही. आम्ही कोणी संत नाही. फक्त आपल्या गुरुंचं ध्यान लावतो आणि भक्तांसमोर आपलं म्हणणं मांडतो; असं त्यांनी स्पष्ट केलं.
श्याम मानव यांचं आव्हान
बागेश्वर बाबा यांनी आपण दिव्यशक्तीने अनोळखी व्यक्तीचं नाव आणि पत्ता ओळखतो, असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी आव्हान दिलं होतं. नागपूरच्या पत्रकार कक्षात आम्ही दहा लोकं आणू. त्यांची नावं आणि पत्ते या बाबांनी सांगावी.
चमत्कार दाखवा, 30 लाख घेऊन जा
तसेच बाजूच्या रुममध्ये दहा वस्तू ठेवू त्या त्यांनी ओळखाव्यात. दोनदा त्यांनी 99 टक्के या वस्तू आणि व्यक्तींना ओळखलं तर आम्ही त्यांना 30 लाखांचं बक्षीस देऊ. त्यासाठी त्यांना 3 लाख रुपये डिपॉझिट ठेवावे लागेल.
त्यांना जर हा चमत्कार नाही दाखवता आला तर त्यांचे तीन लाख रुपये जप्त केले जातील. त्यांनी चमत्कार सिद्ध केला तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटनाच बंद करू, असं आव्हानच श्याम मानव यांनी दिलं आहे.
बाबांनी आव्हान स्वीकारलं
दरम्यान, बागेश्वर बाबांनी श्याम मानव यांचं आव्हान स्वीकारलं आहे. पण त्यांनी नागपूर ऐवजी रायपूरला येण्याचं आव्हान श्याम मानव यांना दिलं आहे. त्यासाठी मानव यांना येण्याजाण्याचं तिकीटही देऊ असं त्यांनी म्हटलं आहे. तर काहीही सिद्ध करायचं असेल तर नागपूरलाच सिद्ध करावे लागेल. रायपूरला तुमची माणसं असू शकतात, असं श्याम मानव यांनी म्हटलं आहे.