एक होता राजा, चौथी पास, मित्रासोबत देश लुटला, बँका लुटल्या.., केजरीवाल यांनी भर विधानसभेत सांगितली गोष्ट Video
दिल्लीच्या विधानसभेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आमदारांना चौथी पास राजाची गोष्ट ऐकवली. यावेळी त्यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केलं.
नवी दिल्ली : दिल्लीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी आज भर विधानसभेत (Assembly) आमदारांना गोष्ट ऐकवली. एक होता राजा. फार शिकलेला नव्हता. चौथी पासच होता. पण त्याला खूप गर्व होता. राजा खूप भ्रष्टाचारी होता. त्याला पैशांचा हव्यास होता. या राजाला भाषण देण्याचा छंद होता. अशिक्षित असल्याने राजाने अनेक फायलींवर सह्यासुद्धा केल्या. राजा कमी शिकलेला असल्याने लोक त्याच्यावर टीका करत असत. त्यामुळे राजाने खोटी डिग्रीच तयार करून घेतली. तो स्वतःला एम ए पास म्हणू लागला…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री मागितल्यावर ही बाब केजरीवाल यांच्यावरच कशी उलटली, यावरून निशाणा साधला. आमदारांना गोष्ट ऐकवताना केजरीवाल म्हणाले, एक चौथी पास राजा होता. त्याने एमएची खोटी डिग्री तयार केली. माहितीच्या अधिकाराखाली याची माहिती मागितली तर लोकांवर त्याने 25-25 हजार रुपयांचा दंड ठोठवला. मोदींच्या डिग्री प्रकरणावरून केजरीवाल यांनी या गोष्टीद्वारे धारदार निशाणा साधल्याचं म्हटलं जातंय.
एक चौथी पास राजा की कहानी… https://t.co/tUirANQive
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 17, 2023
टार्गेट मोदी, पुढची गोष्ट काय?
पुढची गोष्ट सांगताना अरविंद केजरीवाल म्हणाले, एक दिवस रात्री 8 वाजता राजाने सगळ्या चलनी नोटा बंद केल्या. देशात हाहाकार माजला. लोकांचे धंदे बंद पडले. लोकांकडे रोजगारही उरला नाही. त्यानंतर शेतकरी कायदे केले. मूर्खपणाने या राजाने ते तीन काळे कायदे मंजूर केले. त्यामुळे देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले.
चौथी पास राजाने मित्रासोबत मिळून देश लुटला. सरकारी ठेके मित्राला दिले. मित्राच्या नावाखाली देशात लूट चालवली. आधी बँका लूटल्या. मित्राला कर्ज वाटले. राजा आणि त्याच्या मित्राने सरकारी संपत्तीवर कब्जा केला… अशी गोष्ट केजरीवाल यांनी सांगितली.
दिल्लीच्या विधानसभेत आम आदमी पार्टीचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं थेट नाव न घेता निशाणा साधला. ही गोष्ट ऐकताना उपस्थित विधानसभा सदस्यांमध्ये चांगलाच हशा पिकला. सोशल मीडियात आज केजरीवाल यांनी सांगितलेल्या गोष्टीचा व्हिडिओ चर्चेत आहे.