Atiq Ahmad ची पत्नी आता एसटीएच्या रडारवर, जमवली इतक्या कोटींची माया
माफिया अतिक अहमदची पत्नी आता सरकारच्या रडारवर आहे. एसटीएफकडून आता अतिकच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई होणार आहे. अतिकची पत्नी फरार असल्याने तिचाही शोध सुरु आहे.
मुंबई : देशात सध्या माफिया अतिक अहमद याच्या हत्येची चर्चा आहे. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने माफिया अतिक अहमद विरोधात कारवाई करत माफियांना इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. अतिक अहमदचा मुलगा एन्काऊंटमध्ये मारला गेला. त्यानंतर अतिक आणि त्याचा भाऊ या दोघांची काही जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. अतिक अहमद याने अनेकांच्या जमिनी लाटल्याचा आरोप होता. उमेश पाल हत्या प्रकरणानंतर योगी सरकारने अतिक अहमदला या प्रकरणी ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणानंतर अतिक अहमद याची पत्नी शाइस्ता परवीन देखील फरार आहे. या प्रकरणात अतिकच्या पत्नीवर देखील 50 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, शाइस्ता ही एक मोठी रिअल इस्टेट व्यावसायिक आहे. अतिक तुरुंगात गेल्यानंतर शाइस्ता त्याचा संपूर्ण व्यवसाय सांभाळत होती. आता एसटीएफला अतिकच्या यूपीपासून दिल्ली आणि हरियाणापर्यंतच्या संपत्तीची माहिती गोळा करत आहे.
एसटीएफकडून लवकरच कारवाई
एसटीएफ शाईस्ताच्या सर्व संपत्तीची यादी तयार करत आहे. तिच्यासोबत या संपत्तीत आणखी कोण-कोण सामील होते, याची माहिती गोळा केली जात आहे. लवकरच या मालमत्ता सील केल्या जाऊ शकतात. प्रयागराजमध्ये शाईस्ताची सर्वाधिक मालमत्ता असल्याचं बोललं जात आहे.
ग्रेटर नोएडा, दिल्ली आणि गुरुग्राममध्येही त्यांनी संपत्ती जमवली आहे. अतिक अहमद याने 2019 मध्ये वाराणसीमधून निवडणूक लढवली होती. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्याने 25 कोटींची संपत्ती जाहीर केली होती. दुसरीकडे, सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अतिककडे 1169 कोटींची मालमत्ता आहे.
गुरुग्राममध्ये अतिकच्या नावाने फना असोसिएटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवली जात असल्याची माहिती एसटीएफला मिळाली आहे. मेसर्स जाफरी स्टेट लिमिटेड, जी गुरुग्राममधूनच कार्यरत आहे, त्यांचा रिअल इस्टेटचा मोठा व्यवसाय आहे. त्याचे संपूर्ण काम शाईस्ता पाहत असे. वेगवेगवळ्या राज्यांमध्ये अतिकची संपत्ती असल्याचं बोललं जात आहे.
रोशन बाग परिसरात अतिक अहमदचे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले जात आहे जिथे त्याचा कट्टर शत्रू चांद बाबा याची हत्या करण्यात आली होती. बांधकाम करणाऱ्या बिल्डरला एसटीएफने ताब्यात घेतले आहे. कोट्यवधी रुपयांच्या या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा नकाशाही पीडीएकडे उपलब्ध आहे. तोही जप्त करण्याची तयारी सुरू आहे.