मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाबा बालकनाथ अचानक मागे पडले? जाणून घ्या तीन मोठी कारणे
3 डिसेंबरपासून बाबा बालकनाथ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटत होते. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना अधिक वेग आला होता, परंतु, त्यांच्या अचानक माघार घेण्याच्या भूमिकेची काही कारणे समोर आली आहेत.
राजस्थान | 10 डिसेंबर 2023 : राजस्थानमध्ये कॉंग्रेसला हद्दपार करून भाजपची सत्ता आली. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु झाली. वसुंधरा राजे आणि राजस्थानचे योगी म्हणवले जाणारे बाबा बालकनाथ अशी दोन नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होती. मात्र, या स्पर्धेमधून बाबा बालकनाथ यांनी माघार घेतली आहे. भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच जनतेने खासदार आणि आमदार बनवून देशसेवेची संधी दिली आहे. मला अजून पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव घ्यायचा आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करा असे बाबा बालकनाथ यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी बाबा बालकनाथ हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सहभागी झाले होते. पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात त्यांचा दबदबा चांगलाच असल्याचे बोलले जात होते. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचा दावा अधिकच भक्कम झाला. 3 डिसेंबरपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटत होते. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांना अधिक वेग आला होता, मात्र, आता बाबा बालकनाथ यांनी थेट वक्तव्य करून या गोष्टी फेटाळून लावल्या आहेत. परंतु, त्यांच्या अचानक माघार घेण्याच्या भूमिकेची काही कारणे समोर आली आहेत.
बाबा बालकनाथ यांना राजकीय जीवनाचा फार अनुभव नाही. बाबा बालकनाथ पहिल्यांदाच खासदार झाले आहेत. आमदार होण्याचीही त्यांची पहिलीच वेळ आह्रे. या दृष्टीने बाबांचा राजकीय अनुभव हा केवळ पाच वर्षांचा आहे. त्यामुळे राजकीय अनुभवाअभावी मुख्यमंत्र्यांची खुर्ची बाबांपासून दूर गेली.
बाबा बालकनाथ हे ओबीसी प्रवर्गात येतात. राजस्थान शेजारील राज्य मध्य प्रदेशमध्ये विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि प्रल्हाद सिंह पटेल हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. हे दोघेही ओबीसी प्रवर्गातील आहेत. तर, दुसरे शेजारी राज्य छत्तीसगड येथे भाजपने आदिवासी समाजातील चेहरा विष्णूदेव साय यांना मुख्यमंत्री केले आहे.
राजस्थान शेजारील दोन राज्यात ओबीसी आणि आदिवासी समाजाला भाजपने प्रतिनिधित्व दिले. त्यामुळे राज्यस्थानमध्ये अन्य समाजाला मुख्यमंत्री देऊन त्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याची तयारी भाजप करत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत या दूरदृष्टीपणाचा फायदा होईल असे भाजपला वाटत आहे.
उत्तर प्रदेश हे राजस्थानचे दुसरे शेजारी राज्य आहे. उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहेत. अशा परिस्थितीत भाजपने राजस्थानमध्ये बाबा बालकनाथ यांना मुख्यमंत्री केले असते तर दोन राज्यांचे मुख्यमंत्री योगी झाले असते. एकीकडे भाजप हिंदुत्वाच्या गप्पा मारतो, पण दुसरीकडे सर्व समाजांना सोबत घेऊन त्यांचा विकास करण्याचा दावा करतो.
भाजपने बालकनाथ यांना मुख्यमंत्री बनवले असते तर योगीराजांना प्रोत्साहन देणारे आणि कट्टर हिंदुत्वाचे राजकारण करणारे असा पक्षाचा ब्रँड झाला असता. लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा ब्रँड भाजपला परवडणारा नाही त्यामुळेच बाबा बालकनाथ यांचे नाव मागे पडले अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान. राजस्थानचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याचा फैसला सोमवर होणार आहे.