जगन्नाथ यात्रा सुरु असताना मोठं संकट, बाल्कनी कोसळली, थरकाप उडवणारा व्हिडीओ
जगन्नाथ यात्रा सुरु असताना अचानक एका दुमजली इमारतीची बाल्कनी तुटली. त्यामुळे या बाल्कनीवर उभे असलेले अनेक जण खाली कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये जगन्नाथ यात्रेचा उत्सव सुरु आहे. या उत्सवादरम्यान आज रथयात्रा निघाली होती. या रथयात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले होते. तसेच बघ्यांची देखील प्रचंड मोठी गर्दी होती. अनेक भाविक हे यात्रा ज्या रोडवरुन जात आहे त्यालगत असलेल्या इमारतींच्या बाल्कनीतून आणि खिडकीतूनदेखील रथयात्रा पाहत होते. अत्यंत आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. पण या दरम्यान एक संकट कोसळलं. त्यामुळे या रथयात्रेला गालबोट लागलं.
जगन्नाथ यात्रा सुरु असताना अचानक एका दुमजली इमारतीची बाल्कनी तुटली. त्यामुळे या बाल्कनीवर उभे असलेले अनेक जण खाली कोसळले. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. बाल्कनीच्या क्षमतेपेक्षा जास्त भाविक तिथे उभे असल्याने ती खाली कोसळली, अशी माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या मजल्यावरची बाल्कनी खाली कोसळली. त्यामुळे पहिल्या मजल्यावर बाल्कनीत उभ्या असलेल्या भाविकांनादेखील त्याचा फटका बसला आहे. ते देखील या दुर्घटनेत जखमी झाल्याची शक्यता आहे.
घटना कॅमेऱ्यात कैद
संबंधित घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतील दृश्य आपल्याला विचलित करु शकतात. एक रथ समोरुन जात असतो. त्याच्या बाजूला भाविकांची प्रचंड गर्दी असते आणि अचानक इमारतीची बाल्कनी खाल कोसळते. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडते. आरडाओरड सुरु होते. बाल्कनी कोसळल्यानंतर अनेक जण बाजूला होतात. संबंधित घटना कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाली आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होतोय.
अहमदाबाद में रथ यात्रा के दौरान हादसा, बालकनी टूटने से कई घायल#Ahmedabad #AhmedabadRathYatra pic.twitter.com/sNkKyX7pTq
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) June 20, 2023
अमित शाह रथयात्रेत सहभागी
ओडिशाच्या पुरी येथे तसेच देशातील अनेक भागांमध्ये जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथेही रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. इथे दरवर्षी रथयात्रेचं आयोजन होतं. भगवान जगन्नाथ यांच्या 146 व्या रथयात्रेत अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्या संपूर्ण परिवारासह सहभागी झाले. त्यांनी या रथयात्रेत पूजा देखील केली.
सुरक्षेसाठी एकूण 25 हजार पोलीस तैनात
अहमदाबादमध्ये दरवर्षी मोठी रथयात्रा निघते. या रथयात्रेची गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी सुरु होती. ही रथयात्रा एकूण 30 किमीची आहे. या यात्रेत सुरक्षेसाठी एकूण 25 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आलेलं. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत या यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर अनेक दिग्गज या यात्रेत सहभागी झाले.