बारमुलामध्ये सुरक्षापथकांना मोठं यश, PM मोदींच्या दौऱ्याआधी तीन दहशतवाद्यांचा खात्मा
सैन्याने त्या जिल्ह्यातील घनदाट जंगलात 4,000 पेक्षा अधिक प्रशिक्षित सैनिकांना तैनात केलं आहे. यात विशिष्ट पॅरा कमांडो आणि पर्वतीय युद्धासाठी ट्रेन सैनिक आहेत.
जम्मू-काश्मीरच्या बारामुलामध्ये चकमकीत सुरक्षापथकांना मोठं यश मिळालं आहे. भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या जॉइंट ऑपरेशनमध्ये तीन दहशतवादी मारले गेल्याची शनिवारी पोलिसांनी पुष्टी केली. सध्या ऑपरेशन सुरु आहे. इंटेलिजेंस इनपुट्सनुसार तिथे काही दहशतवादी लपले असल्याची माहिती आहे. माहिती मिळाल्यानंतर 13-14 सप्टेंबरच्या रात्री टप्पर क्रीरी भागात ऑपरेशन राबवण्यात आलं. बारामुलामध्ये सुरक्षा पथक आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री चकमक सुरु झाली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या भागात दोन ते तीन दहशतवादी लपले आहेत. दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ऑपरेशन सुरु आहे.
यूटीच्या किश्तवाडमध्ये शुक्रवारी जेसीओसह दोन जवान शहीद झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नैदघाम गावच्या वरच्या भागात पिंगनल दुगड्डा वनक्षेत्रात सर्च टीम आणि दहशतवाद्यांमध्य गोळीबार झाला. सैन्याचे चार जवान जखमी झाले. यात दोन जखमी जवान जेसीओ नायब सूबेदार विपन कुमार आणि अरविंद सिंह यांनी उपचारादरम्यान प्राण सोडले.
पर्वतीय युद्धासाठी ट्रेन सैनिक तैनात
जम्मू डिवीजनच्या डोंगराळ भागात पुंछ, राजौरी, डोडा, कठुआ, रियासी आणि उधमपुर येथे मागच्या दोन महिन्यांपासून सैन्यावर आणि सामान्य नागरिकांवर दहशतवादी हल्ले होत आहेत. दहशतवादी घात लावून अचानक हल्ला करतात. त्यानंतर डोंगराळ भागातील जंगलाचा फायदा घेऊन पसार होतात. यामागे परदेशी दहशतवाद्यांचा एक गट आहे. 40 ते 50 च्या संख्येने हे दहशतवादी आहेत. सैन्याने त्या जिल्ह्यातील घनदाट जंगलात 4,000 पेक्षा अधिक प्रशिक्षित सैनिकांना तैनात केलं आहे. यात विशिष्ट पॅरा कमांडो आणि पर्वतीय युद्धासाठी ट्रेन सैनिक आहेत.
आज काश्मीरमध्ये मोदींची पहिलीच सभा
केंद्र शासित प्रदेशात (यूटी) अशा प्रकारच्या दहशतवादी घटना चिंताजनक आहेत. इथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार कॅम्पेनर असून शनिवारी ते जम्मू-काश्मीरमध्ये येत आहेत. डोडाच्या स्पोर्ट्स स्टेडियममधून जनसभेला संबोधित करतील. निवडणुकीच्या घोषणेनंतर काश्मीरमध्ये पंतप्रधान मोदींची ही पहिलीच सभा आहे. त्यानंतर 19 सप्टेंबरला ते श्रीनगरला जातील.