बीबीसी आयकर छापे, भाजप विरुद्ध काँग्रेस, शिवसेनेमध्ये जुंपली
देशात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केला आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने जगातील सर्वात भ्रष्ट संस्था बीबीसी असल्याचा आरोप केला आहे.
नवी दिल्ली : गुजरात दंगलीवर आधारीत माहितीपटावरून भाजप आणि बीबीसी दरम्यान वाद सुरु असताना मंगळवारी मोठी बातमी आली आहे. मुंबई आणि दिल्ली येथील बीबीसीच्या मुख्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहे. आयकर विभागाचे अधिकारी या कार्यालयाची झाडा झडती घेत आहेत. त्यानंतर मात्र काँग्रेस आणि शिवसेनेने सरकारवर टीका केली आहे. देशात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप या दोन्ही पक्षांनी केला आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने जगातील सर्वात भ्रष्ट संस्था बीबीसी असल्याचा आरोप केला आहे. दिल्ली, मुंबई बीकेसी येथील बीबीसी कार्यालयातही IT चं धाडसत्र सुरु झालं आहे. बीकेसीच्या आवारात विंडसर बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर बीबीसीचे कार्यालय आहे. त्या ठिकाणी छापे टाकले आहे. छापे टाकणारी टीम दिल्लीवरुन आली आहे.
उद्धव ठाकरे बरसले
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे म्हणाले की, बीबीसी कार्यालयांवर टाकलेले छापे कोणत्या लोकशाहीत बसते ते सांगा? आपल्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना दडपण्याचे काम केले जात आहे. हा प्रकार थांबला पाहिजे. भारत मातेला गुलाम करण्याचा हा प्रयत्न आहे, तो रोखण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल.
काँग्रेसची टीका
बीबीसी कार्यालयांवरील छापेमारीनंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. आधी बीबीसीची डॉक्युमेंटरीवर बंदी आली. आता बीबीसीवर छापेमारी झाली. ही अघोषित आणीबाणी आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश ट्टिट करत म्हटले की, अदानी प्रकरणावरून आम्ही जेपीसीची मागणी करत आहोत. आता सरकार बीबीसीच्या मागे लागली आहे. विनाश काले विपरीत बुद्धी, अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे.
सर्व संस्था भाजपच्या बाहुल्या
भारत राष्ट्र समितीचे नेते केटी रामाराव यांनी ट्विट करून लिहिले, काय आश्चर्य आहे. मोदींवरील माहितीपट प्रसारित केल्यानंतर काही आठवड्यांनंतर बीबीसी इंडियावर छापे टाकले गेले. आयटी, सीबीआय आणि ईडीसारख्या एजन्सी भाजपच्या सर्वात मोठ्या बाहुल्या बनल्या आहेत.
भाजपकडून प्रतिहल्ला
भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, BBC चा प्रचार आणि काँग्रेसचा अजेंडा एकत्र काम करत आहे. BBC चा इतिहास भारताला कलंकित करणारा आहे. इंदिरा गांधींनी BBC वर बंदी घातली होती. BBC ने आपल्या वृत्तांकनादरम्यान काश्मीरमधील दहशतवाद्याचे वर्णन करिष्माई तरुण असे केले होते.
BBC ने होळीच्या सणावर भाष्य केले. इतकंच नाही तर बीबीसीने महात्मा गांधींवरही प्रतिकूल टिप्पणी केली होती. ही उदाहरणे खूप महत्त्वाची आहेत. BBC भ्रष्ट संस्था आहे. जर त्यांना भारतात काम करायचे असेल तर भारतीय कायद्यानुसार करायला हवे. कंपनीत चुकीचे काही नसेल तर घाबरण्याची भीती का?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून आयकर विभागाला या कार्यालयांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची माहिती मिळाली होती. याच संदर्भाने ही झाडा झडती सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. बीबीसीच्या खात्यांसंबंधीची माहिती आयकर विभागातर्फे खंगाळून काढली जात आहे. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसी कार्यालयातील अनेक कंप्यूटर्स आपल्या ताब्यात घेतले आहेत.