पुढील महामारीसाठी आधीच तयार राहा, नीती आयोगाने काय दिला इशारा
NITI आयोगाने भविष्यातील साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या अंमलात आणण्याची शिफारस करण्यात आली आहे, यामुळे सरकारला जलद आणि प्रभावीपणे कोणत्याही परिस्थितीसोबत लढता येईल. संशोधन संस्था आणि देखरेख यंत्रणा मजबूत करण्यावरही भर देण्यात आलाय.
उपचारासाठी बेड मिळत नसल्याने नातेवाईकांची धावपळ, स्मशानभूमीबाहेर लागलेल्या लांबलचक रांगा, ऑक्सिजन सिलिंडरसाठी भटकणारे लोक आजही कोविड महामारीच्या दरम्यानचे हे दृश्य आपल्याला विचलीत करतात. कोरोनाचं नाव ऐकलं तरी लोकांच्या अंगावर काटा येतो. आता चार वर्ष झाल्यानंतर ही कोरोना महामारीच्या जखमा ताज्या आहेत. कोविडमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमवलं. याचं दु:ख अजूनही पीडितांच्या कुटुंबियांना सतावत आहे. महामारीमुळे आधीच यंत्रणा तयार केली तर यावर तोडगा काढला जाऊ शकतो का याबाबत एक अहवाल समोर आला आहे. या अहवालात आरोग्य संस्था आणि संघटनांना पुढच्या आजारांबाबत सक्रिय राहण्याचा इशारा दिला आहे.
100 दिवसांतच प्रभावी योजना
NITI आयोगाने स्थापन केलेल्या तज्ञ समितीने भविष्यात जर आरोग्याशी संबंधित आणीबाणी आली किंवा साथीच्या रोग पसरले तर त्याचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक फ्रेमवर्क तयार करण्याची शिफारस केली आहे. ‘पॅन्डेमिक प्रिपेडनेस अँड इमर्जन्सी रिस्पॉन्स’ नावाचा हा फ्रेमवर्क आहे. ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन व्यवस्थापन कायदा’ तयार करण्याची आणि पहिल्या 100 दिवसांतच कोणत्याही साथीच्या रोगाला प्रभावीपणे रोखण्याची योजना आखण्याची शिफारस यामध्ये करण्यात आली आहे.
जून 2023 मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली होती. ज्यांनी कोविड-19 महामारी आणि इतर सार्वजनिक आरोग्य संकटांच्या अनुभव आणि आव्हानांवर आधारित अहवाल तयार केला. सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘COVID-19 ही शेवटची महामारी नक्कीच नाही. कारण अनपेक्षितपणे बदलत जाणारं हवामान आणि मानव-प्राणी-वनस्पती क्रियाकलाप पाहता नवीन संसर्गजन्य धोके कधीही उद्भवू शकतात.’
11 सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेल्या ‘भविष्यातील महामारीची तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद यासाठी एक फ्रेमवर्क या समितीने तयार केली आहे. कोरोना महामारीमुळे देशातील न्यूरोसायन्स औषधाचे मोठे नुकसान झाले. वैद्यकीय अभ्यास अपुरा पडला. इंडियन मेडिकल जर्नल ऑफ रिसर्च (आयजेएमआर) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात ही माहिती समोर आली आहे.
अभ्यासानुसार, 2020 मध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर, औषधाच्या इतर क्षेत्रांसह, न्यूरोसायन्सशी संबंधित संशोधनावरही परिणाम झाला. नऊ रुग्णालयांतील ५०० हून अधिक डॉक्टर विविध आजार आणि त्यांच्या उपचारांशी संबंधित अभ्यासात गुंतले होते, परंतु २०२१ मध्ये डेल्टा वेव्हमुळे डॉक्टरांनी आपला संपूर्ण वेळ कोरोना वॉर्डमध्ये घालवला. ज्यामुळे अनेक डॉक्टरांना त्यांचा अभ्यास अर्धवट सोडावा लागला होता.