कोलकाता: पश्चिम बंगालच्या भवानीपूर पोटनिवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोघांनी आपली ताकद पणाला लावली आहे. भाजप आणि टीएमसीचे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, भवानीपूरमधील जादूबाबू बाजाराजवळ भाजपने स्ट्रिट कॉर्नर मिटींग घेतली. या मिटींगवेळी टीएमसी कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आता भाजपकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यात भाजपच्या युवा मोर्चाचे दक्षिण कोलकाता अध्यक्ष मुकुद झा जखमी झाले आहेत. त्यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुसरीकडे, टीएमसीने ट्विट करत आरोप केला की, दिलीप घोष यांच्या सुरक्षा रक्षकाने दिवसा-ढवळ्या बंदूक भिरकावण्याचा प्रकार केला, जो अतिशय घातक आहे. ( bhawanipur by election bjp Leaders attacked during election campaign tmc accused mamta banarjee priyanka tibarewal )
ममता बॅनर्जींना रोखण्यासाठी भाजपने आपल्या तब्बल 80 नेत्यांना मैदानात उतरवलं आहे. या नेत्यांनी संपूर्ण जोमाने या विधानसभा सीटवर प्रचाराला सुरुवात केली. दुसरीकडे TMC नेही पूर्ण तयारी केल्याचं चित्र आहे. टीएमसी नेते प्रचारात झोकून देऊन काम करत आहेत.
TMC कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप
भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, जडुबाजारामध्ये भाजपची एक स्ट्रीट कॉर्नर मीटिंग झाली. ज्यात अर्जुन सिंह, बॅरकपूरचे भाजप खासदार आणि बंगाल भाजपचे उपाध्यक्ष उपस्थित होते. त्याचवेळी काही टीएमसी कार्यकर्त्यांनी येऊन बैठकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. टीएमसी समर्थकांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये भाजप कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. ममता बॅनर्जींवर टीका करताना अर्जुन सिंह म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुका जिंकण्यासाठी दहशतीचा वापर केला. दुसरीकडे, टीएमसीनेही तोफ डागली आणि आरोप केला की, भाजपकडून दिवसा ढवळ्या बंदूकीचा धाक दाखवण्यात आला. हे नैतिकतेला शोभणारं नाही.
दिलीप घोष यांच्या सभेनंतरच गोंधळ सुरू
जेव्हा दिलीप घोष यांची आजची बैठक सुरू झाली, तेव्हा अचानक गोंधळ उडाला. दिलीप घोष यांच्यासमोरच हा हल्ला झाल्याचा भाजपचा आरोप आहे. भाजप कार्यकर्त्यांवर रस्त्यावर हल्ले होत असल्याचा आरोप करण्यात आला. भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार म्हणाले, “दिलीप बाबू प्रचाराला गेले, तेव्हा टीएमसी घाबरली. ते जय बांगलाचा जयघोष करत होते. लोकांना धमकावून मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. भवानीपूर हे अफगाणिस्तानपेक्षा कमी नाही. पोलीस गुलाम झाले आहेत. ” निवडणूक आयोगाने भवानीपूरसह तीनही जागांवरील सर्व मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित केली आहेत. सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षा दलाचे जवान तैनात कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक भागात केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी परेडही काढली. भवानीपूर मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने ममता बॅनर्जी यांच्याविरोधात प्रियांका टिबरेवाल यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा कोणत्याही प्रकारे जिंकण्याचा आणि ममता बॅनर्जींना हरवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
हेही वाचा: