आधार आणि पॅन कार्डचा डेटा लीक करणाऱ्या 3 वेबसाइट ब्लॉक, सरकारची मोठी कारवाई
केंद्र सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड डेटा लीक करणाऱ्या 3 वेबसाइट ब्लॉक केल्या आहेत. आधार प्राधिकरणाने वेबसाइट्सविरोधात एफआयआर दाखल केला आहे. काही दिवसापूर्वीच स्टार हेल्थच्या 3 कोटींहून अधिक लोकांचा वैयक्तिक डेटा लीक झाला आहे.
आधार कार्ड आणि पॅन कार्डचा डेटा लीक करणाऱ्या 3 वेबसाइट केंद्र सरकारने ब्लॉक केल्या आहेत. या वेबसाइट्स स्टार हेल्थचा लीक झालेला डेटा त्यांच्या वेबसाइटवर दाखवत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर आधार प्राधिकरणाने या वेबसाइट्सविरोधात एफआयआर दाखल केलाय. स्टार हेल्थच्या 3 कोटींहून अधिक ग्राहकांना वैयक्तिक डेटा लीक झाल्याने एकच खळबळ उडाली. स्टार हेल्थने देखील हॅकर, टेलिग्राम आणि त्यात सामील असलेल्या लोकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. डेटा लीक थांबवणे शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण ते सहजपणे दुसऱ्या वेबसाइटवर अपलोड केले जाऊ शकते. ते VPN वापरून पाहता येते. डेटा इतर चॅटबॉट्स आणि वेबसाइट्समध्ये प्रविष्ट केला जाऊ शकतो. नवीन डेटा संरक्षण कायदा अद्याप लागू झालेला नाही.
सरकार काय म्हणाले?
सुरक्षित इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे. काही वेबसाइट्स देशातील नागरिकांचा आधार आणि पॅन कार्ड डेटा लीक करत असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. सरकार सायबर सुरक्षा आणि वैयक्तिक डेटाच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देते. या संदर्भात या वेबसाइट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत.
या वेबसाइट्सवर देशातील नागरिकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड डेटा लीक केल्याचा आरोप आहे. त्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. डेटा लीकच्या या घटनेने लोकांची चिंता वाढली आहे.
Government of India takes action to protect Citizens’ Data: Websites Exposing #Aadhaar and #PAN Details blocked
IT secretaries of the State empowered to address complaints and compensations for Data Privacy violations
Read here: https://t.co/lkyslySIdw@GoI_MeitY
— PIB India (@PIB_India) September 26, 2024
हॅकर्सच्या निशाण्यावर भारतीय नागरिक
जानेवारीमध्ये, हे उघड झाले की 75 कोटी भारतीय टेलिकॉम युजर हॅकर्सचे लक्ष्य आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना या प्रणालीचे ऑडिट करण्यास सांगितले होते. यामागे हॅकर्सकडे युजर्सचे फोन नंबर आणि आधार कार्ड यांसारख्या डिटेल्स असल्याचे समोर आले आहे.
CloudSEK (सायबर सुरक्षा फर्म) ने दावा केला होता की, हॅकर्सच्या एका गटाने भारतीय मोबाइल नेटवर्क ग्राहकांचा एक मोठा डेटाबेस विक्रीसाठी डार्क वेबवर ठेवला होता. त्यासाठी ते 3 हजार डॉलर्सची मागणी करत आहेत. डेटासेटमध्ये 85 टक्के भारतीय युजर्सचा डेटा असू शकतो.