राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेकडून ही मोठी घोषणा
ayodhya dham : राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आनंदाचे वातावरण आहे. सगळीकडे जय्यत तयारी सुरु आहे. अनेक भारतीय त्या दिवशी दिवाळी साजरी करणार आहेत. त्यातच भारतीय रेल्वेने देखील एक मोठी योजना आखली आहे. काय आहे ती योजना जाणून घ्या.
Ram Mandir : भारतात सगळीकडे उत्सवाचे वातावरण आहे. कारण २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार असून या दिवशी दिवाळी साजरी केली जाणार आहे. राम मंदिराचा संघर्ष लक्षात घेता रामभक्तांसाठी हा मोठा दिवस असणार आहे. सगळीकडे उत्सवाचा तयारी सुरु आहे. त्यातच आता भारतीय रेल्वेने देखील एक मोठा निर्णय घेतला आहे. राम मंदिर प्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यासाठी सज्ज आहे असताना प्रभू रामाच्या नावावर असलेली एकूण 343 स्थानके सुशोभित केली जाणार आहे. या रेल्वे स्थानकांवर विद्युत रोषणाई केली जाणार आहे.
देशभरात 343 रेल्वे स्थानके
आंध्र प्रदेशात ५५ आणि तामिळनाडूत ५४ भगवान रामाच्या नावावर रेल्वे स्थानके आहेत. त्यानंतर राम नावाच्या सर्वाधिक स्थानकांच्या बाबतीत बिहार तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशभरात अशी 343 रेल्वे स्थानके आहेत. या सर्व स्थानकांवर विद्युत रोषणाई केली जाणार आहे. ही स्थानके सजवली जाणार आहेत.
आंध्र प्रदेशातील रामचंद्रपुरम, कर्नाटकातील रामगिरी, तेलंगणातील रामागुंडम आणि रामकिस्तापुरम, कर्नाटकातील रामनगरम, तेलंगणातील रामनापेट, आंध्र प्रदेशातील रामापुरम आणि इतर अनेक स्थानके आहेत जी रामाच्या नावावर आहेत. राम चंद्रपूर, रामगंज आणि रामचौरा रोड यांसारख्या रामाच्या नावावर विविध स्थानके उत्तर प्रदेशमध्ये देखील आहेत.
भारतीय रेल्वेकडून ही जय्यत तयारी
भारतीय रेल्वे २२ जानेवारीच्या दिवशी उत्सवात आणखी भर पाडणार आहे. राम मंदिर बनत असल्याने अनेक भारतीय आनंदी आहेत. कारण राम हे अनेकांच्या मनात श्रद्धेचे स्थान आहेत. श्री रामांचं हे मंदिर हजारो वर्ष टिकेल अशा प्रकारे तयार करण्यात येत आहे. राम मंदिरासाठी ५०० वर्षाचा संघर्ष करावा लागला आहे. मोदी सरकारने राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी देखील जाहीर केली आहे. यामुळे या सगळ्यांना हा सोहळा लाईव्ह पाहता येणार आहे.
राम मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाण्यासाठी अनेक लोकं उत्सूक आहेत. २३ जानेवारी रोजी एक लाख लोकं अयोध्येत येण्याची शक्यता आहे. यासाठी रेल्वेने विशेष रेल्वे देखील सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या विविध भागातून या रेल्वे अयोध्येला येणार आहेत. इतकंच नाही तर अयोध्या विमानतळाचे देखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. त्यामुळे विमानाने देखील लोकांना अयोध्येला येता येणार आहे.
भारतीय रेल्वे लवकरच देशभरातून 200 हून अधिक गाड्या सुरू करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अयोध्येला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही.