उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसने संभाव्य उमेदवारांची पहिली यादी जारी केल्यानंतर पक्षातील सदस्यांमध्ये नाराजीचे वारे वाहू लागले आहेत. रामपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराने पक्ष सोडून सपाचे सदस्यत्व पत्करले. तर प्रियंका गांधींनी 40 टक्के महिलांना तिकिट देण्यासाठी राज्यात सुरु केलेल्या मोहिमेचा चेहरा प्रियंका मौर्य (Priyanka Maurya) भाजपमध्ये प्रवेश करू शकते, अशीही चर्चा आहे. बुधवारी प्रियंका मौर्य भाजपच्या कार्यालयात गेली होती. त्यानंतर ती भाजपात प्रवेश करतेय, अशी जोरदार चर्चा सुरु झाली.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील 40 टक्के महिला उमेदवारांना तिकिट देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यात ‘मै लडकी हूं, लड सकती हूं’ अशी मोहीमही सुरु करण्यात आली. या मोहिमेच्या पोस्टर्सवरील काँग्रेस कार्यकर्ती प्रियंका मौर्य ही असून या चळवळीसोबत ती जोडली गेलेली आहे. मागील काही दिवसांपासून प्रियंका मौर्य चर्चेत आली होती. प्रियंका गांधी यांचे खासगी सचिव संसदीप सिंह यांच्यावर तिने तिकिट विकल्याचा आरोप केला होता. प्रियंका मौर्य हिला लखनौमधील सरोजनी नगर येथून तिकिट हवे होते. मात्र पक्षाने तिला या जागेसाठीचे तिकिट दिले नाही. त्यामुळे ती प्रियंका गांधी आणि काँग्रेस नेतृत्वावर नाराज आहे.
भाजपच्या कार्यालयात गेलेल्या प्रियंका मौर्य हिने माध्यमांशी संवाद साधला. ती म्हणाली, मी माझ्या विभानसभा मतदारसंघात खूप मेहनत घेतली होती. मात्र पक्षाने तेथून मला तिकिट दिले नाही. काँग्रेस महिलांच्या हक्काच्या चर्चा करते, पण इथे आमच्या हक्कांकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे काँग्रेसची ही मोहीमच फसवी आहे, असा आरोप प्रियंका मौर्य हिने केला आहे.
प्रियंका मौर्यने भाजपात प्रवेश केल्यास विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश काँग्रेससाठी हा मोठा धक्का ठरू शकतो.
इतर बातम्या-