मोठी बातमी समोर येत आहे, हरियाणामध्ये रेल्वेच्या डब्यात स्फोट झाला आहे. ही ट्रेन रोहतकवरून सुटली होती. रस्त्यातच या ट्रेनमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकताच ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला. या घटनेत चार जण भाजल्यामुळे जखमी झाले आहेत तर काही जणांनी रेल्वेमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे या घटनेत आणखी चार जण जखमी झाले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना दुपारी साडेचारच्या सुमारास सांपला रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे.गंधक आणि पोटॅशमुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
ज्या रेल्वेमध्ये स्फोट झाला, त्या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितलं की,आम्ही बहादुरगढला जाण्यासाठी रोहतक स्टेशनवरून चार वजून वीस मिनिटांनी सुटणाऱ्या ट्रेनमध्ये बसलो. त्यानंतर ही ट्रेन काही वेळात सांपला रेल्वे स्टेशनवर पोहोचली. सांपला रेल्वे स्टेशनवरून जेव्हा ही रेल्वे बहादुरगडला निघाली त्याचवेळी गाडीत मोठा स्फोट झाला. त्यानंतर ट्रेनला आग लागली. स्फोटाचा आवाज ऐकताच लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. गोंधळ उडाला काही लोकांनी ट्रेनमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला.या घटनेत चार जण आगीमुळे जखमी झाले आहेत.
दरम्यान ज्या डब्याला आग लागली होती, त्या डब्यात बसलेल्या महिला प्रवाशांनी सांगितलं की, आम्ही आमच्या सीटवर जाऊन बसलो होते. सीटच्यावर असलेल्या मोकळ्या जागेत सामान ठेवलं होतं.त्याच सामानात कोणी तरी दिवाळीच्या फटाक्यांसाठी आवश्यक असणारं गंधक आणि पोटॅश ठेवलं. त्याचाच स्फोट झाला. या स्फोटामुळे मोठा गोंधळ उडाला.