स्लीपर वंदेभारत ट्रेनबाबत मोठी अपडेट, आनंदाची बातमी आली
वंदेभारत एक्सप्रेस आलिशान आणि वेगवान असल्याने प्रवाशांची आवडती ट्रेन बनली आहे. विशेषत: तरुण वर्गाला ती आवडत आहे. देशात सध्या 34 वंदेभारत सुरु आहेत. भारताची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन असलेल्या वंदेभारतची स्लीपर कोच आवृत्ती केव्हा येणार याची प्रतिक्षा सर्वांना लागली आहे. त्यातच वंदेभारत स्लीपर कोचबाबत महत्वाची अपडेट रेल्वेने दिली आहे.
मुंबई | 3 फेब्रुवारी 2024 : वंदेभारत ट्रेनला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता भारतीय रेल्वे वंदे भारतचे स्लीपर कोचचे व्हर्जन लॉंच करण्याच्या बेतात आहे. यासंदर्भातील एक चांगली बातमी रेल्वेने दिली आहे. सध्याच्या वंदेभारत ट्रेन केवळ चेअरकार असल्याने लांबच्या रात्रीच्या प्रवासासाठी झोपून जाण्याची सोय होत नव्हती. त्यामुळे वंदेभारतची स्लीपर कोचची तयारी गेले अनेक महिने सुरु आहे. युपीच्या रायबरेली येथील मॉर्डन कोच फॅक्टरीमध्ये आठ नवीन स्लीपर वंदे भारत तयार करण्याचे काम सुरु आहे. या स्लीपरला 16 डब्बे असणार आहेत, त्यात 11 एसी 3 टायर, चार एसी 2 टायर आणि एक एसी फर्स्ट क्लास असे डबे असणार आहेत. या ट्रेनच्या डब्यांना 20 – 24 पर्यंत वाढविण्याची सोय असणार आहे.
रायबरेली येथील एमसीएफ कारखान्यानंतर कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरी, चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्टरी येथेही वंदेभारतसाठी कोच तयार होत आहेत असे टाईम्सच्या बातमीत म्हटले आहे. पहिल्या टप्प्यात स्लीपर वंदेभारतचे दोन रेक कारखान्यातून बाहेर पडणार असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आर.एन.तिवारी यांनी म्हटले आहे. त्यानंतर अन्य स्लीपर कोच वंदेभारत दुसऱ्या टप्प्या टप्प्याने बाहेर पडतील. वंदेभारत एक्सप्रेस ट्रेनच्या निर्मितीसह रायबरेलीच्या एमसीएफ येथील कारखान्यात साल 2024 मध्ये एसी आणि नॉन एसी कोचच्या पुश एण्ड पुल ट्रेनची निर्मिती केली जाणार आहे.
वंदेभारत ट्रेनची बजेटमध्ये घोषणा
अलिकडेच संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम बजेट सादर करताना वंदेभारत ट्रेनबद्दल मोठी घोषणा केली आहे. रेल्वे 40,000 सामान्य डब्यांना वंदेभारत धर्तीच्या डब्यांमध्ये परिवर्तित करणार आहे. तसेच रेल्वेने तीन आर्थिक कॉरिडॉरची देखील घोषणा केली आहे. त्यामुळे गर्दीच्या कॉरिडॉरवरील ट्रॅफीक कमी होण्यास मदत होणार आहे. रेल्वेच्या परिचलनाला मदत मिळून प्रवासी सुरक्षा वाढून आणि प्रवासाच्या वेगात वाढ होणार आहे. डेडीकेटेट फ्रेट कॉरीडॉरसह तीन आर्थिक कॉरीडॉरमुळे जीडीपीच्या विकासदरात वाढ होऊन मालवाहतूकीचा खर्चात बचत होणार आहे.