इंफाळ | 5 ऑगस्ट 2023 : गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेला मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. रोज मणिपूरमध्ये कुठे ना कुठे हिंसाचार घडताना दिसत आहे. अचानक मोठ्या संख्येने जमाव येतो आणि जाळपोळ, तोडफोड करून पळून जातो. काल तर विष्णूपूर येथे काही समाजकंटकांनी पोलिसांच्या रायफल्स आमि काडतूसे पळवली. हा शस्त्रसाठा जमाव पळवून नेत असताना जवान आणि जमावात प्रचंड झटापट झाली. या हाणामारीत दोन डझनहून अधिक जवान जखमी झाले आहेत. या समाजकंटकांनी राज्यात हिंसाचार सुरू झाल्यापासून जमावाला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. प्रचंड संख्येने येऊन जवानांवर हल्ला करून त्यांच्याकडील शस्त्रे पळवून नेण्यावर या जमावाचा भर असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात तणावाचं वातावरण पसरलं आहे.
या हिंसक जमावाने काल आजपर्यंतची सर्वात मोठी लूट केली आहे. मोठ्या प्रमाणावर जवानांचा दारुगोळा पळवून नेला आहे. 500 लोकांनी जवानांवर हल्ला चढवून रायफल्स आणि 16 हजार काडतूसे पळवून नेली आहेत. या जमावाला पकडण्यासाठी जवानांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. मात्र, समाजकंटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना रोखण्यात जवानांना अपयश आलं.
या समाजकंटकांनी 298 रायफल्स, एसएलआर, एलएमजी आणि मोर्टार, ग्रेनेड लूटून नेले आहेत. कमीत कमी 16 हजार राऊंड घेऊन पलायन केलं आहे. या प्रकरणी मोईरंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार ही शस्त्रास्त्रांची आजवरची सर्वात मोठी लूट आहे. या समाजकंटकांनी एकत्र येऊन द्वितीय इंडिया रिझर्व्ह बटालियनच्या मुख्यालयावर हल्ला केला. कुकी समुदायाला हिंसेत मारण्यात आलेल्या लोकांना चुराचांदपूरच्या हाओलाई खोपी येथे सामुदायिक दफन करायचं होतं. पण बहुसंख्य समुदायाने त्याला विरोध केला होता. त्यामुळे अनेक जिल्ह्यात हिंसा पसरली आहे.
जमावाने या आयआरबी कार्यालयावर हल्ला चढवला. 16 हजार राऊंड जिवंत काडतुसे, एके सीरीजच्या असॉल्ट रायफल, तीन घातक रायफल, 195 सेल्फ लोडिंग रायफल, पाच एमपी-4 गन, 16 पिस्तुल, 25 बुलेटप्रुफ जॅकेट, 21 कार्बाईन, 124 ग्रेनेडसहीत अन्य दारूगोळा लुटून नेण्यात आलाआहे. दरम्यान, हा जमाव इंफाळच्या अन्य दोन शस्त्रागारांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. पण सुरक्षा दलाचे जवान आधीच अलर्ट होते. त्यामुळे जमावाला लुटमार करता आली नाही.
दरम्यान, विष्णूपूर येथे काल रात्री उशिरा एकाच कुटुंबातील तीन लोकांची हत्या करण्यात आली आहे. बफर झोन तोडून काही लोक आतमध्ये आले आणि अंधाधूंद गोळीबार करत एकाच कुटुंबातील तीन जणांचा खात्मा केला. त्यानंतर हे हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अधिक तपास केला आहे. दरम्यान, गेल्या काही तासांपासून मणिपूरमध्ये आणि त्यातही विष्णूपूरमध्ये हिंसेचा आगडोंब उसळला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू असून तोडफोडही करण्यात येत आहे.