मोठी राजकीय बातमी, नीतीशकुमार यांचा राजीनामा, नवीन घरोबा भाजपसोबत

| Updated on: Jan 28, 2024 | 11:29 AM

Bihar Political Crisis : नितीश कुमार पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत गेले आहे. त्यांनी लालूप्रसाद यादव यांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते नवव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

मोठी राजकीय बातमी, नीतीशकुमार यांचा राजीनामा, नवीन घरोबा भाजपसोबत
Follow us on

पटना | 28 जानेवारी 2024 : बिहारमध्ये गेल्या दोन, तीन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा शेवट झाला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांना राजीनामा दिला आहे. नीतीश कुमार पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) गेले आहे. यामुळे बिहारमध्ये पुन्हा सत्ताबदल होत आहे. आज संध्याकाळी नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षही आणि एनडीएमधील इतर पक्ष असणार आहे. नीतीश कुमार आज नवव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तसेच गेल्या पाच वर्षांत तिसऱ्यांदा ते शपथ घेणार आहेत.

भाजपची बैठक, पाठिंबा देण्याचा निर्णय

नीतीश कुमार यांनी रविवारी सकाळी ११ वाजता राजभवनात जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. आता काही वेळात भाजपचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचतील. त्यानंतर आजच नीतीश कुमार नवीन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान भाजप आमदारांची बैठक झाली. या बैठकीत नीतीशकुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. यासंबंधित पत्रावर आमदारांच्या सह्या घेतल्या जात आहेत. त्यानंतर भाजप आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहचणार आहे. या ठिकाणी एनडीएच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत नीतीश कुमार यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होणार आहे.

दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत घेणार शपथ

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार 2 उपमुख्यमंत्र्यांसह आज संध्याकाळीच शपथ घेणार आहेत. ते नवव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत शपथ घेणारे दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपचे असू शकतात. तसेच भाजप-जेडीयूकडून प्रत्येकी 14 मंत्री शपथ घेऊ शकतात. जीतन राम मांझी यांच्या पक्षानेही 2 मंत्रीपदांची मागणी केली आहे. गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील शपथविधीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

खेळ अजून बाकी

नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. एनडीएच्या पाठिंब्याने ते नवीन सरकार स्थापन करत आहेत. जेडीयू विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नितीश कुमार यांनी भाजपच्या दिग्गज नेत्याशी फोनवर चर्चा केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शपथविधीसाठी राजभवनात जय्यत तयारी सुरू झाली आहे. दरम्यान राजद नेता तेजस्वी यादव यांनी खेळ अजून बाकी असल्याचे म्हटले आहे.