लोकसभा उमेदवारीबाबत भाजपचा मास्टरप्लॅन, पाहा कुणाला मिळणार संधी
भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदार ठरवण्यासाठी तीन टप्पे तयार करण्यात आले आहेत. या तीन टप्प्यांनुसार उमेदवार ठरवले जाणार आहेत. भाजपच्या निवडणूक समितीची सध्या दिल्लीत बैठक सुरु आहे. या बैठकीत याबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याचे संकेत मिळत आहेत.
संदीप राजगोळकर, Tv9 प्रतिनिधी, नवी दिल्ली | 29 फेब्रुवारी 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत. भाजपला या निवडणुकीत तब्बल 400 जागांपेक्षा जास्त जागांवर विजय मिळवायचा आहे. यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपकडून दिग्गज नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लोकसभेची उमेदवारी कुणाकुणाला द्यायची यासाठी आता भाजपमध्ये खलबतंदेखील सुरु झाली आहे. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात भाजपच्या लोकसभा निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागांबाबत चर्चा होणार आहे. तसेच उमेदवार देखील निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी भाजपकडून तीन टप्पे तयार करण्यात आले आहे. या तीन टप्प्यांच्या आधारावर भाजप उमेदवारांची निवड करणार आहे.
भाजपकडून लोकसभा उमेदवारीबाबत तीन टप्पे तयार करण्यात आले आहेत. यातील पहिला टप्पा हा व्हीआयपी उमेदवारांसाठी असणार आहे. यामध्ये केद्रींय मंत्री आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात राज्यसभेतील खासदारांचा असणार आहे. तर तिसरा टप्पा इतर महत्त्वाच्या नेत्यांचा असणार आहे. भाजप लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. या उमेदरवार यादीबाबत सध्या नागरिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कुणाकुणाला संधी दिली जाते, कुणाला पुन्हा संधी मिळते आणि कुणाचं तिकीट कापलं जातं याबाबत लवकरच काही दिवसांत आता स्पष्ट होण्याचे संकेत मिळत आहेत.
उमेदवारांची निवड ‘अशी’ केली जाणार
- पहिला टप्पा व्हीआयपी उमेदवार = यामध्ये केंद्रीय मंत्री आणि इतर मोठ्या नेत्यांची उमेदवारी असणार
- दुसरा टप्पा राज्यसभेतील खासदार = राज्यसभेतील विद्यमान आणि माजी खासदारांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार
- तिसरा टप्पा = पराभूत उमेदवार किंवा दोन नंबर क्रमांकाची मत मिळालेल्या उमेदवारांची यादी
भाजपकडून ‘या’ उमेदवारांचं तिकीट कापलं जाणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप काही खासदारांचं तिकीट देखील कापणार आहे. यामध्ये दोन किंवा तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या नेत्यांचं तिकीट कापलं जाणार आहे. विशेष म्हणजे 25 ते 30 टक्के खासदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.