दिग्गजांचे पंख छाटले, महाराष्ट्रातील बड्या नेत्याला यूपीचे तिकीट; भाजपच्या यादीत काय काय?
लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारांची यादी जाहीर करणारा भाजप हा पहिला राजकीय पक्ष ठरला आहे. भाजपने आज 195 उमेदवारांची नावे घोषित केली आहे. भाजपच्या या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, स्मृती ईराणी, हेमा मालिनी, मनोज तिवारी, रवी किशन, शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
नवी दिल्ली | 2 मार्च 2023 : भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी घोषित केली आहे. भाजपने पहिल्या यादीत जास्तीत जास्त राज्यातील उमेदवारी घोषित केली आहे. महिलांना स्थान देतानाच विविध जाती घटकांनाही या यादीत स्थान देण्यात आलं आहे. भाजपने आजच्या निवडणूक यादीतून एक प्रकारे सोशल इंजीनिअरींग केली आहे. मात्र, या यादीत अल्पसंख्याक समाजाला स्थान देण्यात आलेलं नाही. पहिल्या यादीत 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांना तिकीट देण्यात आलं आहे. पण काहील दिग्गजांची तिकीटही कापण्यात आले आहे.
भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी पहिल्या यादीतील 195 उमेदवारांची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, स्मृती ईराणी, हेमा मालिनी, मनोज तिवारी, रवी किशन, शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह अनेक दिग्गजांना पहिल्या यादीत संधी देण्यात आली आहे. नावासहीत या उमेदवारांचे मतदारसंघही जाहीर करण्यात आले आहेत.
दिग्गजांचे पंख छाटले
भाजपने या निवडणुकीत प्रखर हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह यांचं तिकीट कापलं आहे. त्यांच्या ऐवजी आता भोपाळमधून आलोक शर्मा हे निवडणूक लढवणार आहे. भाजपच्या या निर्णयामुळे साध्वी प्रज्ञा सिंह यांना मोठा धक्का बसला आहे. त्याशिवाय केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांचंही तिकीट भाजपने कापलं आहे. तर केपी यादव यांचं मध्यप्रदेशातील गुना येथून तिकीट कापण्यात आलं आहे. आता गुनामधून ज्योतिरादित्य सिंधिया निवडणूक लढणार आहेत.
कृपाशंकर सिंह यांना लॉटरी
महाराष्ट्रातील माजी मंत्री आणि भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांचा राजकीय विजनवास संपला आहे. कृपाशंकर सिंह यांना भाजपने थेट उत्तर प्रदेशातील जौनपूरमधून तिकीट दिलं आहे. कृपाशंकर सिंह हे भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर अडगळीत पडले होते. काँग्रेसमध्ये असताना त्यांचं वर्चस्व संपुष्टात आलं होतं. त्यानंतर ते भाजपमध्ये आले. पण भाजपमध्येही त्यांना राजकीय संधी देण्यात आली नव्हती. आता मात्र कृपाशंकर सिंह यांना थेट लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे कृपाशंकर सिंह हे लोकसभेत दिसणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.