भाजपने पाचव्या यादीत अनेक मोठ्या नेत्यांचा पत्ता केला कट, पाहा कोण आहेत या यादीत
भाजपने आज आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक मोठ्या नेत्यांची तिकीट कापली गेली आहे. पक्षात राहून पक्षाच्याच नेत्यांवर टीका करणाऱ्या नेत्यांचा यात समावेश आहे. भाजपने त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. कोण आहेत ते नेते जाणून घ्या.
Loksabha election : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आज आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केलीये. भाजपच्या या यादीतून अनेक मोठ्या नेत्यांचे तिकीट कापले गेले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रविवारी पाचव्या यादीत १११ उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीतून भाजपने माजी केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांच्या जागी गाझियाबादमधून स्थानिक आमदार अतुल गर्ग यांना तिकीट दिले आहे. बिहारमधील बक्सरमधून केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचे तिकीट कापले असून, त्यांच्या जागी मिथिलेश तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
एवढेच नाही तर उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील विद्यमान खासदार वरुण गांधी यांचे तिकीट कापून त्यांच्या जागी योगी सरकारमधील मंत्री जितिन प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वरुण गांधी यांचे तिकीट रद्द झाले असले तरी भाजपने त्यांची आई मनेका गांधी यांना सुलतानपूरमधून पुन्हा उमेदवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना ओडिशातील संबलपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
अभिनेत्री कंगना राणौतचेही नाव भाजपच्या या यादीत आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशातील मंडी येथून तिकीट देण्यात आले आहे. काही काळापूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले माजी खासदार नवीन जिंदाल यांना भाजपने कुरुक्षेत्रमधून उमेदवारी दिली आहे. तर झारखंडमधील दुमका येथून भाजपने सीता सोरेन यांना उमेदवारी दिली आहे. सीता सोरेन या झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वहिनी असून त्यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला होता.
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह पुन्हा एकदा बेगुसरायमधून निवडणूक लढवणार आहेत, तर अन्य केंद्रीय मंत्री बिहारमधून नित्यानंद राय, उजियारपूरमधून आरके सिंह, पाटलीपुत्रमधून रामकृपाल यादव निवडणूक लढवणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना पुन्हा एकदा पटना साहिबमधून तर सुशील कुमार सिंग यांना औरंगाबादमधून तिकीट देण्यात आले आहे. नवाडामधून राज्यसभा सदस्य विवेक ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह पूर्व चंपारणमधून तर संजय जयस्वाल पुन्हा एकदा पश्चिम चंपारणमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने केरळचे माजी अध्यक्ष के सुरेंद्रन यांना वायनाड मतदारसंघातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे.
भाजपने आतापर्यंत 291 उमेदवाराची यादी केली जाहीर
भाजपने आतापर्यंत 291 लोकसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, केरळ आणि तेलंगणा या राज्यांसह इतर राज्यांतील उमेदवारांचा समावेश आहे. भोजपुरी गायक पवन सिंगसह घोषित केलेल्या तीन उमेदवारांनी वादानंतर आपली नावे मागे घेतली आहेत. लोकसभेच्या 543 जागांसाठी 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.