नवी दिल्ली : भाजप नेते किरीट सोमय्या आता पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना किरीट सोमय्या यांनी एकहाती विरोधकांवर आरोपांचे असंख्य बाण सोडले होते. किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांवर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यांनी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडे संबंधित नेत्यांची आणि मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. त्यासाठी त्यांनी तपास यंत्रणांना कागदपत्रे देखील दिले होते. किरीट सोमय्यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीतील अनेक मंत्री आणि बडे नेते अडचणीत आले होते. राज्यात आता सत्तापालट झालीय. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचं सरकार स्थापन झालं आहे. नवं सरकार स्थापन होऊन तीन महिने झाल्यानंतर सोमय्या पुन्हा कामाला लागले आहेत. ते आज दिल्लीत दाखल झाले. या दरम्यान त्यांनी वित्त मंत्रालयासह इतर विभागांना भ्रष्टाचाराचे कागदपत्रे दिल्याची माहिती समोर आली आहे. सोमय्या यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
“मुंबई मनपात कोरोना काळात घोटाळा झालाय. या घोटाळ्यांची 12 प्रकरण आहेत”, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. आपण पुराव्यासह कागदपत्रे केंद्र सरकारकडे दिल्याची माहिती सोमय्यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली.
“आज मी दिल्लीत वित्त मंत्रालय, सहकार मंत्रालय आणि अनेक अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, मंत्र्यांच्या भेटी घेतल्या”, अशीदेखील माहिती त्यांनी यावेळी दिली.
“मुंबईत कोविड सेंटर चालू केली होती. त्यातील बारा घोटाळ्यांची कागदपत्रे मी केंद्र सरकारकडे दिली आहेत. यामध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झालाय. मुंबई मनपात हा आर्थिक घोटाळा झालाय. मी स्वतः त्याचा अभ्यास केला”, असं किरीट सोमय्या म्हणाले.
“12 घोटाळ्यांचे कागदपत्रे पुराव्यासह केंद्र सरकारकडे दिले आहेत. काही ठिकाणी कोव्हिड केंद्र नसताना कंत्राट दिलं गेलं, यामध्ये नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची नावं आहेत”, अशी धक्कादायक माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.
“पेण अर्बन बँकेचा प्रश्न मार्गी लागणार, ठेवीदारांना त्यांचा पैसा मिळणार, बँकेची मालमत्ता विकण्याचा निर्णय झाला आहे. पेण बँकेच्या प्रॉपर्टीचा पैसा ठेवीदारांना दिला जाणार”, अशी माहिती यावेळी किरीट सोमय्या यांनी दिली. तसेच “623 कोटींचा हा घोटाळा होता. 12 वर्ष हा प्रश्न तसाच होता. आता हा प्रश्न मार्गी लागेल”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.