नक्षलवाद्यांकडून भाजपच्या बड्या नेत्याची हत्या, संपूर्ण राज्य हादरलं
छत्तीसगडमधून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या एका बड्या नेत्याची छत्तीसगडमध्ये हत्या करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाआधीच हत्येची ही घटना घडली आहे. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
रायपूर | 4 नोव्हेंबर 2023 : देशातील पाच राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार केला जातोय. या प्रचारादरम्यान छत्तीसगडमधून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या एका बड्या नेत्याची छत्तीसगडमध्ये हत्या करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाआधीच हत्येची ही घटना घडली आहे. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांनी भाजप नेत्याला टार्गेट केलं आहे. त्यांनी भाजप नेत्यावर गोळ्या झाडत हत्या केली आहे. त्यामुळे संबंधित परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय.
मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रतन दुबे यांची हत्या केली आहे. रतन दुबे प्रचारासाठी गेले होते. या दरम्यान नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. संबंधित घटना ही नारायणपूर विधानसभा मतदारसंघातील कौशलनगर परिसरात घडली आहे. रतन दुबे हे नारायणपूरचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष होते. तसेच ते मालवाहन परिवहन संघाचे जिल्हाध्यक्षदेखील होते. ते कौशलनगर बाजार या परिसरात भाजपच्या प्रचारासाठी गेले होते. तिथून परतत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.
याआधीदेखील भाजप नेत्याची हत्या
छत्तीसगडच्या नारायणपूरसह इतर 20 विधानसभा मतदारसंघांमध्ये 7 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडणार आहे. त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली आहे. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांनी भाजप नेत्यावर हल्ला करण्याची छत्तीसगडमध्ये ही पहिली घटना नाही. याआधीदेखील नक्षलवाद्यांनी मानपूर-मोहला परिसरातही भाजप नेत्याची हत्या केली होती. त्यानंतर वारंवार हा मुद्दा चर्चेत येतो. तेव्हापासून भाजपच्या स्थानिक नेत्यांना सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.